

Gayatri Datar
मुंबई: ‘तुला पाहते रे’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलेली लाडकी अभिनेत्री गायत्री दातार लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. काही दिवसांपूर्वीच तिने आपल्या आयुष्यात ‘हिरोची एन्ट्री’ झाल्याचे सांगत प्रेमाची कबुली दिली होती. मात्र, तिचा होणारा जोडीदार कोण? याबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. अखेर ख्रिसमसच्या शुभमुहूर्तावर गायत्रीने आपल्या होणाऱ्या नवऱ्याची ओळख करून देत चाहत्यांना मोठे सरप्राईज दिले आहे.
गायत्रीने सोशल मीडियावर एक रोमँटिक व्हिडिओ शेअर करत आपल्या होणाऱ्या जोडीदाराचे नाव जाहीर केले आहे. अभिनेत्रीच्या होणाऱ्या पतीचे नाव श्रीकांत चावरे असे आहे. श्रीकांत हा फोटोग्राफर असून तो मुंबईचा रहिवासी आहे. विशेष म्हणजे, त्याचे शिक्षण नामांकित IIT मुंबई मधून झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
गायत्रीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती आणि श्रीकांत समुद्रकिनारी निवांत वेळ घालवताना दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना तिने कॅप्शनही दिले आहे. तिने लिहिले की, "आयुष्यभर माझ्यासाठी 'सांता' असणाऱ्या व्यक्तीला भेटा..." या पोस्टवर श्रीकांतने केलेली कमेंटही सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. त्याने गायत्रीला उद्देशून "तू मला मिळालेले बेस्ट गिफ्ट आहेस," असे लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
गायत्रीच्या या पोस्टनंतर मित्र-मैत्रिणी आणि चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अनेकांनी "जोडी छान आहे," अशा कमेंट्स करत या नवीन प्रवासासाठी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. गायत्री दातारने 'तुला पाहते रे' या मालिकेतून पदार्पण केले होते. त्यानंतर ती 'बिग बॉस मराठी' आणि 'अबीर गुलाल' यांसारख्या लोकप्रिय कार्यक्रमांमध्ये झळकली आहे. आता तिच्या लग्नाची तारीख कधी जाहीर होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.