

Shilpa Shinde Controversy: टीव्ही अभिनेत्री शिल्पा शिंदे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. मात्र यावेळी कारण तिची कोणतीही नवी मालिका किंवा शो नसून, जवळपास दहा वर्षांपूर्वी केलेल्या एका गंभीर आरोपाबाबत तिने दिलेली कबुली आहे.
‘भाभीजी घर पर हैं’ या लोकप्रिय मालिकेचे निर्माते संजय कोहली यांच्यावर आपण लैंगिक छळाचा खोटा आरोप केला होता, अशी कबुली शिल्पा शिंदेने नुकतीच एका मुलाखतीत दिली. या वक्तव्यानंतर मनोरंजन विश्वात मोठी खळबळ उडाली असून आता ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने (AICWA) तिच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे.
AICWA ने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खोट्या लैंगिक छळाच्या आरोपांमुळे एखाद्या व्यक्तीची प्रतिष्ठा, करिअर, कुटुंब आणि मानसिक स्वास्थ्य यांचे अपरिमित नुकसान होऊ शकते. अशा आरोपांमुळे केवळ संबंधित व्यक्तीच नव्हे तर त्यांचे कुटुंबीय आणि जवळचे लोकही गंभीर परिणामांना सामोरे जातात.
संघटनेने म्हणले की, जाणीवपूर्वक केलेले खोटे आरोप हे खऱ्या पीडित महिलांच्या न्यायाच्या लढ्यालाही धक्का देतात. अशा घटनांमुळे समाजात खरी तक्रार करणाऱ्या महिलांबद्दलही संशय निर्माण होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे अशा प्रकरणांची गंभीरतेने चौकशी होणे आवश्यक असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
या प्रकरणात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावे आणि संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणीही AICWA ने केली आहे. जर आरोप जाणीवपूर्वक खोटे असल्याचे सिद्ध झाले, तर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, असे संघटनेने म्हटले आहे.
2016 मध्ये शिल्पा शिंदेने लोकप्रिय मालिका ‘भाभीजी घर पर हैं’ सोडली होती. त्या काळात निर्मात्यांसोबत तिचा गंभीर वाद झाला होता. मानधन न मिळणे, मानसिक छळ, करारातील अटी आणि निर्मात्यांकडून गैरवर्तन अशा अनेक आरोपांनी हे प्रकरण गाजले होते.
याच काळात शिल्पा शिंदेने निर्माते संजय कोहली यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले होते. मात्र आता एका पॉडकास्टमध्ये बोलताना तिने हे आरोप खोटे असल्याचे मान्य केले आहे.
कॉमेडियन भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्टमध्ये बोलताना शिल्पा शिंदेने सांगितले की, त्या काळात तिच्यासमोर दुसरा पर्याय नव्हता. पोलिसांनी एफआयआर नोंदवण्यासाठी गंभीर आरोप करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे तिने तो मार्ग स्वीकारला.
नंतर IANS ला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितले की, या घटनेनंतर तिच्यावर अनेक आरोप झाले, तिला मानसिक त्रास सहन करावा लागला आणि विरोध झाला. अखेर इतकी वर्षे हे ओझे मनात ठेवायचे नाही म्हणून तिने सत्य स्वीकारण्याचा निर्णय घेतला.
विशेष म्हणजे, शिल्पाने असा दावा केला की संजय कोहली यांनी तिच्याशी संपर्क साधून सत्य कबूल केल्याबद्दल आभार मानले. दरम्यान, शिल्पाच्या या कबुलीनंतर मनोरंजन क्षेत्रात नव्या चर्चांना उधाण आले आहे. खोटे आरोप, न्यायव्यवस्था, महिलांचे हक्क आणि जबाबदारी या विषयांवर आता पुन्हा एकदा चर्चा रंगताना दिसत आहे.