

हंबरडा
शेत गेले पाण्याखाली कशी करणार दिवाळी?
औक्षण केल्या बहिणीला काय देऊ ओवाळणी
वाहून गेली शेती माती अन् शेताचे झाले तळे...
खरवडलेल्या मातीमध्ये कुठे शोधू हिरवे मळे !
दौऱ्यावर दौरे आले नुसती पाहणी करून गेले...
मिळेल तेव्हा मिळेल मदत, पण स्वप्न मरून गेले!
गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, आधार आमचा बुडाला...
संसाराचा झाला चिखल, पारंब्या नाही मनाच्या वडाला !
दुष्काळात नवस केले, कधी देव पावला नाही नवसाला
गरिबांच्या तोंडचा घास नेला, काय म्हणू या पावसाला !
जरी दुष्काळ होता तरी तुकड्या संग खात होतो खरडा
आता नुसते नाव काढले पावसाचे तरी फुटतो हंबरडा !
आता नुसते गाव काढले पावसाचे तरी फुटतो हंबरडा !
- नारायण निवृत्ती गाडेकर
ऋतू पावसाळा
ऋतू आवडे मज पावसाळा, लावी मना हा जिव्हाळा...
नभा मंडपातून बरसले अमृत जल, मिळाले सृष्टीला नवजीवन. रुजले बियाणे मातीत खोल, गगनाची धरतीला ही भेट अनमोल.
ऋतू आवडे मज हा पावसाळा लावी मना हा जिव्हाळा ॥
पिऊन अमृत जल बहरली अवखळ धरती,
पांघरली तिने हिरवीकंच शाल भोवती...
उमलली सुंदर रानफुले तिच्या वरती,
फूलपाखरे भिरभिरे त्यांच्या भोवती.
नटली धरती, नववधू जणू भासती...
ऋतू आवडे मज पावसाळा, लावी मना हा जिव्हाळा ॥
खळखळ, खळखळ झरे वाहती दऱ्या-खोऱ्यातून,
वृक्षलता बोलू लागे अंकुरातून...
आकाशाने इंद्रधनुचा सप्तरंगी मुकूट ठेवीला तिच्या डोईवर
सूर्याचा लंपडाव मेघांशी चाले आकाशी...
ऋतू आवडे मज पावसाळा, लावी मना हा जिव्हाळा...॥
खग आनंदाने बागडती जणू स्वागत वर्षाचे करती...
हिरव्या रानी गुरे चरती,
गळ्यातील घंटा त्यांच्या मंजुळ नाद करती...
मोहीत करतो गुराखीचा मंजुळ पावा
ऋतू आवडे मज पावसाळा, लावी हा जिव्हाळा... ॥
किती सुंदर निसर्गाचा देखावा, वाटते चक्षूत साठवावा...
स्वप्न नसे ते खरे असे. पावसाची ती किमया असे...
धुंद तो पावसाळा, रम्य तो पावसाळा.
ऋतू आवडे मज पावसाळा,
लावी मना तो जिव्हाळा...
लावी मना तो जिव्हाळा...
- विजया कराळे, डोंबिवली
मिलन
तो झुकला थोडा
तिला भेटण्यासाठी,
तिने न केले काही
त्याला टाळण्यासाठी ॥1॥
एका अवचित क्षणी
त्याने तिला कवटाळले,
तिनेही नको नको म्हणणे
मोठ्या खुबिने टाळले ॥2॥
मावळतीच्या रंगमहालात
श्वास श्वासाला भेटले,
भाळी धरतीच्या गं
ओठ नारायणाचे टेकले ॥3॥
गगनातून तो उतरला
किरणाचा फेडून शृंगार,
ती सामावली मिठीत
तारकांचा लेवून अलंकार ॥4॥
चालतो आहे शतकानुशतके
त्यांचा हा मीलनाचा खेळ,
चंद्र आहे साक्षीला
कधी पूर्णवेळ, कधी अर्धवेळ॥5॥
- एकनाथ शेडगे
कविते...
माझ्या मनातली स्पंदने
नकळत होऊन शब्द
अलगद उतरतात
तुझ्यात, काव्य रूपाने...
रुतून बसतात ते
थेट माझ्या अंतःकरणात
आणि करतात घाई
कागदावर उतरण्यात...
कधी आनंद, कधी दुःख
भावनांचे किती तरंग
उठवत राहतात
शब्दांचे आवेग असंख्य...
पण कविते..
तुझे हे शब्द, खरंच
घेतात ठाव अंतरंगाचा
का फक्त पोकळ बुडबुडे
आणि भोवती बाजार स्वार्थाचा...
- प्रतिभा चांदूरकर
खेळ सापशिडीचा...
सापशिडीच्या त्या खेळामध्ये चढणे आणि उतरणे,
कधी गाठी शंभरी तर कधी एकाकडे परतणे,
बालपणीचा खेळ शिकवी युक्तीने डाव खेळणे,
अविचाराने सापात अडकूनी घरंगळत येणे,
खाली आल्यावर परत टाका, असे फासे जीवनाचे,
सकर्माने शिड्या चढा वर, गाठणे घर ते मोक्षाचे,
काहीच नाही हो शाश्वत येथे, सोडून दोनच घरे,
जन्माचे घर पाहिले, शेवटाला मोक्ष लाभ सत्वरे,
शंभरी गाठून क्षणिक सुख नाही पुढील पडाव,
जन्माने करा पुन्हा सुरुवात असा हा आगळा डाव,
एक शंभरी, की जन्म ते मोक्ष, प्रवास दोन घडीचा,
धीर, संयम, मजा-मस्करी, नि चालाखीही शिकण्याचा,
हुशार, विवेकी, युक्तिवादी कोणी किती जरी असते,
कूकर्मांचा हिशोब मानवा जन्मास आणून ठेवते,
ज्ञानदेवांनी योग्यच रचला मोक्षपट जीवनाचा,
सद्गुण-दुर्गुण दावण्या मांडला खेळ सापशिडीचा,
सुटकेचाही मार्ग दावला, रचूनी त्यांनी हरिपाठ,
हरिनाम जप करणे लिहिले प्रत्येकच ओवीत.
- कल्पनील
श्रावण रंग
आला श्रावण आला
चिंब सकाळ घेऊनी
बहरला जो मातीच्या
धुंद सुवासातूनी
आला श्रावण आला...
ओला हिरवा रंग घेऊनी
शालू वसुंधरेला शोभला
पाना फुलांमधूनी
आला श्रावण आला...
या श्रावणसरी होऊनी
मयुराचा पिसारा फुलतो
श्रावण रंग सवे लेऊनी
आला श्रावण आला...
व्रत वैकल्याने सजुनी
श्रीहरीच्या बासरी संगे
गीत ओठी गाऊनी
आला श्रावण आला...
गणरायाची चाहूल घेऊनी
कथाकथन भजन कीर्तन
आरती प्रार्थनेचा सूर होऊनी
- वैष्णवी सुर्वे
माती
मातीतून आला मातीतच जाशी
का मग हे माझे -
माझे तू करिशी
मातीच तू होतास,
मातीच तुझी होई;
म्हणूनी माणसा आहे तैसा राही.
का पुन्हा पुन्हा मागे वळूनी पाही
हे माझे, ते माझे;
आणखी काही काही
हा गंध हा सुगंध हा दरवळ तू पाही
पण, हे देणारी मृदुला तू न कधी पाही
मातीतून आला मातीतच जाशी
का मग हे माझे -
माझे तू करिशी
चिमूटभरुनी देशी ओंजळभर घेशी
सोबत उपकाराचे ओझेच तू नेशी
ती देते, ती देते तू जमवत रे जाशी
जाताना सोबत का काही तू नेशी?
मातीतून आला मातीतच जाशी
का मग हे माझे -
माझे तू करिशी
- संजीवनी कापडे