

अनुपमा गुंडे
आपल्या सहचराच्या निवडीबद्दल विशेषतः लग्नाच्या बाबतीत आजची पिढी बऱ्याचअंशी ठाम आहे, हे लग्नसंस्थेच्या बदलत्या स्वरूपावरून दिसते. आज पन्नाशीत असलेल्या किंवा त्या आधीच्या पिढीने विशेषतः ज्यांनी प्रेमविवाह केले आहेत, त्या दोघांपैकी एकाला दुसरा आवडतो. या सहज भावनेने एकमेकांशी लग्नाच्या गाठी बांधणारी अनेक जोडपी आजही आपल्या आसपास दिसतात. नंतर हेच प्रेमवीर आयुष्यभर एकमेकांची उणीदुणी काढत बसतात.
प्रेमाच्या आणाभाका घेऊन लग्नवेदीवर चढणाऱ्या अनेकांना नंतर नात्यात प्रेम न गवसल्याने बिनसलेल्या नात्याचं फलित म्हणजे घटस्फोट. घटस्फोट घेताना केवळ मुलीच नाही, तर मुलेही हे माझ्याच वाट्याला का, असा दोष दैवाला देतात.अशाच एकतर्फी प्रेमातून लग्नाच्या बेडीत अडकलेल्या, पण लग्नाच्या नात्यात प्रेम न गवसलेल्या एका तरुणाच्या प्रेमाची ही गोष्ट. गोष्ट मुरवून सांगण्यात पटाईत असलेले दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी हेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
अर्जुन (ललित प्रभाकर), मॅरी (रूचा वैद्य), विनय (प्रसाद बर्वे) हे जीवश्च कंठश्च मित्र. या दोन मित्रांत मॅरी मुलगी असली तरी त्यांच्या मैत्रीत कुठलाच अ़ाडपडदा नाही. मॅरीसाठी तिच्या वडिलांचे वरसंशोधन सुरू असते. आपल्याला न ओळखणाऱ्या सहचराशी सगळं आयुष्य कसं काढायचं अशी थट्टामस्करी सुरू असतानाच मॅरी अर्जुनला लग्नासाठी विचारते आणि तिथून चित्रपटाची कथा रंजक वळण घेते. या दोघांचं लग्न कसं होतं, त्या लग्नातल्या गमती - जमती. चार ॲट्ेम्टनंतर इंजिनीअर झालेला अर्जुन सासऱ्याच्या व्यवसायात काय काम करतो, हे सगळं खूप विनोदी पद्धतीने चित्रपटात सादर झाले आहे.
संसार, लग्न यात विचारात न पडलेल्या अर्जुन संसाराच्या नावेवर हेलकावे खात असतो. पत्नीच्या रूपात त्याला मॅरी दिसतच नाही. या मूळ प्रश्नात लग्नरूपी संस्थेच्या आजच्या पिढीच्या अनेक प्रश्नांची गुंफण दिग्दर्शकाने सुरेख केली आहे. त्यामुळे घटस्फोटापर्यंत पोहोचलेल्या या एकतर्फी प्रेमाच्या लग्नाच्या गोष्टीचा शेवट दिग्दर्शकाने आणि ते सुखाने नांदू लागले. या सुखांतात कसा केला, त्यासाठी राजवाडे यांनी सतत दैवाला आणि देवाला दोष देत अर्जुन सारख्या हजारो तरुणांच्या मनातील प्रश्नांना देवरूपात आलेल्या स्वप्नील जोशी आणि भाऊ कदम यांनी हसतखेळत चपखल उत्तरे दिली आहेत.
आपल्याला आयुष्यात हवं असतं, ते नेहमीच मिळतं असं नाही, आणि जे मिळाले त्याच्यात सुख आणि प्रेम शोधलं तर संसाररूपी नौका वादळातही डगमगत नाही, ती संसारसागर पार करते, हा संदेश विनोदी शैलीत प्रेमाची गोष्ट 2 ने दिला आहे. भाऊ कदम आणि स्वप्नील जोशी या जोडगोळीने उत्तरार्धात धम्माल उडवून दिली आहे. बावरलेला, गोंधळलेला आणि नंतर प्रेम गवसलेला अर्जुन ललित प्रभाकर यांनी छान साकारला आहे.एकूण काय एक चांगली प्रेमकथा पाहण्यासाठी पाहावा असा चित्रपट आहे.