

Dilip Prabhavalkar Dashavatar Box Office Collection updates
मुंबई - मराठी सिनेसृष्टीतील सर्वात भव्य चित्रपट म्हणून 'दशावतार’ रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. सर्वत्र प्रेक्षकांनी चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला आहे. थिएटरमध्ये हाऊसफुल्ल शोज असून आता मुख्य अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी एक इन्स्टा पोस्ट केलीय. ज्यामध्ये त्यांनी प्रेक्षक-सिनेरसिकांचे आभार मानले आहेत. रिलीजच्या पहिल तीन दिवसांतच या चित्रपटाने तब्बल ५ कोटी २२ लाख रुपयांचा गल्ला जमवला होता आता चित्रपटाते अवघ्या ६ दिवसांत ९.४५ कोटींची उड्डाणे घेतली आहेत.
अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत मराठी प्रेक्षकांचे खास आभार मानले आहेत. “दशावतार” या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळाल्याचे सांगत त्यांनी आनंद व्यक्त केला. फक्त ६ दिवसांत या चित्रपटाने तब्बल ९.४५ कोटींचा ग्रॉस बॉक्स ऑफिस कलेक्शन गाठल्याची माहिती त्यांनी दिली. मराठी प्रेक्षकांनी आपल्या मातीतली कला जपून जगभर पोहोचवल्याचे ते म्हणाले. पुढेही हा यशस्वी प्रवास असाच सुरू राहो, अशी त्यांची मनापासून इच्छा आहे. सध्या “दशावतार” तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे.
या चित्रपटात दिलीप प्रभावळकर, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, विजय केंकरे, रवी काळे, लोकेश मित्तल, अभिनय बेर्डे, सुनील तावडे, आरती वडगबाळकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केले आहे. त्यांच्यासह सुजय हांडे, ओंकार काटे, अशोक हांडे, आदित्य जोशी, नितिन सहस्त्रबुद्धे, मृणाल सहस्त्रबुद्धे, संजय दुबे आणि विनायक जोशी चित्रपटाचे निर्माते आहेत.
‘दशावतार’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना कोकणातील समृद्ध संस्कृती, परंपरा आणि लोककलेचा अप्रतिम संगम पाहायला मिळत आहे .दशावतारमधून कोकणातील कला, संस्कृतीसोबतच पर्यावरणाच्या रक्षणाबद्दल केलेले भाष्य प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणारे आहे. चित्रपटाचे कथानक प्रेक्षकांना खुर्चीवर खिळवून ठेवणारा आहे. तगड्या कलाकारांचा दमदार अभिनय प्रेक्षकांना वेड लावणारा आहे. सोबतच गाणी, दृश्ये आणि भव्यता सर्वकाही अजोड ठरणारे आहे.
हा मराठी सस्पेन्स थ्रिलर १२ सप्टेंबर रोजी रिलीज झाला होता. या चित्रपटाचे शो सुरुवातीला तब्बल ३२५ स्क्रिन्सवर उपलबध होते. दशावतारचे ६०० शोज होते. पहिल्या आठवड्यात शनिवारी हा आकडा ८०० वर गेला त्यानंतर रविवारी यामध्ये वाढ होऊन तो ९७५ शोज झाले.
रिपोर्टनुसार, चित्रपटाची ओपनिंग ५० लाखांची होती. दुसऱ्या दिवशी १.२५ कोटींचा बिझनेस केला. तिसऱ्या दिवशी २ कोटी कमावले. वीकेंडचा फायदा देखील चित्रपटाला झाला. चौथ्या दिवशी १ कोटींचे कलेक्शन केले होते. एकूण कलेक्शन ४.७५ कोटी होते. केवळ महाराष्ट्रातच नाही तर गोवा, बेळगाव, बंगळुरु, इंदौर, हैद्राबादमध्येही चित्रपटाची चलती आहे.