

Actor Producer Dheeraj Kumar Death passes away
मुंबई - ज्येष्ठ अभिनेते, निर्माता आणि दिग्दर्शक धीरज कुमार यांचे आज मुंबईत ७९ व्या वर्षी निधन झाले. त्यांचे न्यूमोनियामुळे निधन झाले. त्यांना १२ जुलै रोजी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि ते आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर होते. १५ जुलै रोजी सकाळी ११:४० वाजता त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त आहे. त्यांच्या कुटुंबाने या वृत्ताला दुजोरा दिला. त्यांच्या निधनाच्या वेळी त्यांचा मुलगा आशुतोष कुमार त्यांच्या शेजारी होता.
धीरज कुमार यांची १९६५ पासून हिंदी आणि पंजाबी चित्रपटांमध्ये अभिनय आणि नंतर त्यांच्या क्रिएटिव्ह आय कंपनीद्वारे एक प्रसिद्ध टेलिव्हिजन निर्माता म्हणून कारकीर्द होती. ते स्वामी, रोटी कपडा और मकान, हीरा पन्ना यासारख्या चित्रपटांसाठी आणि ओम नमः शिवाय, अदालत सारख्या लोकप्रिय आध्यात्मिक टीव्ही शोची निर्मिती करण्यासाठी ओळखले जात होते.
चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी धीरज कुमार यांच्या निधनावर शोक व्यक्त करत एक फोटो शेअर केला आहे. फोटोसोबत त्यांनी लिहिलंय-'खूप दु:ख झालं हे ऐकून की प्रसिद्ध अभिनेते, निर्माते धीरज कुमार आपल्यामध्ये नाहीत. ओम शांती.'
धीरज कुमार यांनी अभिनेता म्हमून १९७० च्या दशकात ‘दीदार’, ‘रातों का राजा’, ‘बहारों फूल बरसाओ’, ‘शराफत छोड दी मैंने’, ‘रोटी कपडा और मकान’, ‘सर्गम’, ‘क्रांति’, ‘मान भरों सजना’ यासारख्या चित्रपटांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. जवळपास २१ पंजाबी चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला. ज्यामध्ये ‘सज्जन सिंह रंगरूट’, ‘इक संधू हुंदा सी’, ‘वॉर्निंग २’, ‘माझैल’ चित्रपटांचा समावेश आहे.