पुढारी ऑनलाईन डेस्क - संदीप रघुनाथ मोहिते-पाटील प्रस्तुत आणि उर्विता प्रोडक्शन निर्मित बहुचर्चित ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ या चित्रपटाचा ट्रेलर रसिकांच्या भेटीला आला आहे. नुकताच या चित्रपटाचा दिमाखदार ट्रेलर लाँच सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याचा प्रारंभ चित्रपटातील 'राजं संभाजी' या गाण्याच्या नृत्याने झाला. हा चित्रपट हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगांना भव्यदिव्य स्वरूपात मांडण्यात आले आहे. त्यांच्या शौर्यपूर्ण नेतृत्वाने हिंदवी स्वराज्याचे संरक्षण केले, तसेच धर्माच्या रक्षणासाठी दिलेल्या बलिदानाचे अत्यंत प्रभावी चित्रण करण्यात आले आहे. छत्रपती संभाजी महाराजांची ही शौर्यगाथा या चित्रपटात अनुभवयाला मिळणार आहे.
या चित्रपटात ठाकूर अनुप सिंग, अमृता खानविलकर, किशोरी शहाणे, भार्गवी चिरमुले, मल्हार मोहिते-पाटील, कमलेश सावंत, प्रदीप रावत, प्रदीप कब्रा, राज जुत्शी प्रमुख भूमिकेत पाहायला मिळतील. या चित्रपटाची निर्मिती शेखर रघुनाथराव मोहिते-पाटील, धर्मेंद्र सुभाष बोरा, सौजन्य सूर्यकांत निकम आणि केतनराजे निलेशराव भोसले यांनी केली आहे. ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ हा चित्रपट येत्या २२ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.