

पुढारी ऑनलाईन डेस्क - सध्या बॉलिवूडमध्ये सीक्वल आणि रि-रिलीजचा सुरू आअसताना आता निर्माते सुभाष घई यांनी मोठी घोषणा केली आहे. तब्बल २० वर्षांनंतर ऐतराज या चित्रपटाचा सीक्वल येणार आहे. ऐतराजच्या पहिल्या भागात प्रियांका चोप्रा, अक्षय कुमार आणि करीना कपूर खान होते. आता निर्मात्याने ऐतराज या चित्रपटाच्या सीक्वलबाबत अपडेट शेअर केले आहे. ऐतराज चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला होता. या चित्रपटात प्रियांका चोप्राने खलनायकाची भूमिका साकारली होती आणि तिला यासाठी खूप पसंती मिळाली होती. या चित्रपटाला काल २० वर्षे पूर्ण झाली. या खास प्रसंगी निर्माते सुभाष घई यांनी एक जबरदस्त घोषणा केली.
सुभाष घई यांनी २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील प्रियांका चोप्राचा एक फोटो शेअर केला आणि तिच्या 'बोल्ड आणि ब्युटीफुल' अभिनयाचे कौतुक केले. घई यांनी सांगितले की, प्रियांका ही भूमिका करायला आधी घाबरली होती. पण तरीही तिने पूर्ण आत्मविश्वासाने ही भूमिका साकारली. त्याच पोस्टमध्ये त्यांनी ऐतराज -२ ची घोषणा केली.
ही पोस्ट शेअर करताना सुभाष घई यांनी प्रियांका चोप्राचे कौतुक करत म्हटले- 'बोल्ड आणि ब्युटीफुल प्रियांका चोप्राने धैर्य दाखवले आणि ते केले. त्यामुळेच २० वर्षांनंतरही 'ऐतराज'मध्ये तिने साकारलेली व्यक्तिरेखा चित्रपटप्रेमी विसरू शकलेले नाहीत. ऐतराज माझ्या मुक्ता आर्ट्सने तयार केला आहे.
हिंदुस्तान टाईम्सशी संवाद साधताना सुभाष घई यांनी सांगितले होते की ओ माय गॉड 2 लेखक-दिग्दर्शक अमित राय ऐतराज 2 ची कथा लिहित आहेत. चित्रपट बनवण्यास इच्छुक असलेल्या अनेक स्टुडिओमधूनही त्याला फोन येत आहेत. ते लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
ऐतराज २००४ मध्ये रिलीज झाला होता. ऐतराजमध्ये अक्षय, करीना आणि प्रियांका व्यतिरिक्त अमरीश पुरी, अन्नू कपूर, परेश रावल, विवेक शौक, प्रीती पुरी, उपासना सिंह आणि दिनेश लांबा दिसले होते.