

पुढारी ऑनलाईन डेस्क : विकी कौशल, रश्मिका मंदान्ना आणि अक्षय खन्ना यांचा 'छावा' (Chhava Box Office collection) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड धुमाकूळ घालत आहे. गेल्या महिन्यात १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने समीक्षकांच्या सर्व भाकितांना खोटे ठरवले आहे. या चित्रपटाने जगभरात ५०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. आता हा चित्रपट देशांतर्गत बॉक्स ऑफिसवरही इतिहास रचण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. 'छावा'ने सलमान खान आणि शाहरुख खानच्या अनेक चित्रपटांना मागे टाकले आहे. तसेच तिसऱ्या शनिवारी 'पुष्पा २' सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटालाही मागे टाकले आहे.
तिसऱ्या आठवड्यातही 'छावा'ने बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली. शुक्रवारी या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर १३ कोटी रुपये कमावले. शनिवारी पुन्हा एकदा त्याच्या कमाईत वाढ झाली. सकनिल्कच्या मते, चित्रपटाने १६ व्या दिवशी २१ कोटी रुपयांची भरघोस कमाई केली आहे. यासह, चित्रपटाची देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर कमाई ४३४.२५ कोटी रुपयांवर पोहोचली.
'छावा' चित्रपटाचे बजेट हे 130 कोटींचे आहे. मात्र आता या चित्रपटाने तिपट्ट कमाईच्या जवळ पोहचला आहे. रिलीजनंतर तिसऱ्या शनिवारी कमाईच्या बाबतीत या चित्रपटाने अल्लू अर्जुनचा ऑलटाइम ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा २' ला मागे टाकले. 'पुष्पा २' ने तिसऱ्या शनिवारी (१७ व्या दिवशी) हिंदीमध्ये २० कोटींचा व्यवसाय केला, तर छावा त्यापेक्षा एक कोटी जास्त कमाई करण्यात यशस्वी झाला. तथापि, पुष्पा २ ने तिसर्या शनिवारी सर्व भाषांमध्ये २४.७५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला.
छावा केवळ देशांतर्गत बॉक्स ऑफिसवरच भरपूर कमाई करत नाही तर परदेशातही चांगली कमाई करत आहे. या चित्रपटाने अवघ्या १५ दिवसांत जगभरात ५६६.५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. त्याने परदेशात ७३ कोटी रुपये कमावले. १६ व्या दिवसाचे आकडे अद्याप उघड झालेले नाहीत, म्हणजे जेव्हा हे आकडे येतील तेव्हा कमाईचे आकडे आणखी मोठे असतील. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छवा' चित्रपटात विकी कौशल मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात अक्षय खन्ना मुघल सम्राट औरंगजेबाची भूमिका साकारत आहे. रश्मिकाने या चित्रपटात संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाई भोसले यांची भूमिका साकारली आहे.