

पुढारी ऑनलाईन डेस्क : बाजीगर, डर, अंजाम, अशा नकारात्मक भूमिकेतून अभिनयाची छाप पाडत दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, दिल तो पागल है, कुछ कुछ होता है, वीर- झारा असे काही रोमँटिक चित्रपट देत शाहरुख खानने 'बॉलिवूडचा बादशाह किंग खान' म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत आपलं वेगळं वलयं निर्माण केलं आहे. त्याचे जगभरात लाखो चाहते आहेत. मात्र, आपला बॉलिवूडचा बादशाह किंग खानही एका जगप्रसिद्ध फुटबॉलपटूचा जबरा फॅन आहे. त्याने चक्क रांगेत उभे राहून त्या व्यक्तीची भेट घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडिया तुफान व्हायरल होत आहे.
तो सुप्रसिद्ध फुटबॉलपटू दुसरा तिसरा कोणी नसून अर्जेंटिनाला विश्वचषक जिंकून देणारा फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आहे. गोट (GOAT) इंडिया टूर अंतर्गत लिओनेल मेस्सी शनिवारी (दि.१३) कोलकतामधील सॉल्ट लेक स्टेडियमवर त्याच्याच ७० फूट उंच पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी भारतात आला होता. या दरम्यान बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने रांगेत उभे राहून नम्रपणे आपल्या मुलासह त्याची भेट घेतली. दरम्यान त्याने मुलगा अबरासाठी मेस्सीचा ऑटोग्राफही घेतला. जगप्रसिद्ध फुटबॉलपटू आणि 'बॉलिवूडचा बादशाह किंग खान' यांच्या भेटीचा हा क्षण चाहत्यांसाठी एक पर्वणीच ठरला. त्यांच्या भेटीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावेळी शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानी आणि त्याचा बॉडिगार्डही उपस्थित होता.
अर्जेंटिनाचा जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आज (१४) मुंबईत येणार असून तो वानखेडे आणि ब्रेबॉर्न स्टेडियमवरील कार्यक्रमात सहभागी होणार आहे. या कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी ४.३० वाजता कलाकारांच्या सादरीकरणाने होईल. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता सेलिब्रिटी फुटबॉल सामना होईल. मेस्सी हा ५.३० वाजता व्हीआयपी बॉक्समध्ये मान्यवरांना भेटेल. त्यानंतर मैदानावर चाहत्यांशी संवाद साधणार आहे. कोलकता येथील कार्यक्रमादरम्यान स्टेडिअमची नासधूस झाल्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे त्याच्या सुरक्षेसाठी पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. १४ वर्षानंतर मेस्सी भारतात आल्याने त्याचे जोरदार स्वागत होत आहे.