

bollywood salman khan breaks silence health concerns reveals 16 kg weight loss
पुढारी ऑनलाईन : सलमान खानच्या आरोग्याबाबत गेल्या काही दिवसांपासून बरीच चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता चाहत्यांना दिसला होता. त्यावेळी त्याचे वजन कमी झाल्याचे पाहून चाहत्यांनी चिंता व्यक्त केली होती. यानंतर सोशल मीडियावरही त्याच्या चाहत्यांनी त्याचे फोटो पोस्ट करत सलमानला काय झाले. चेहऱ्यावरचा रंग उडाल्याचे म्हटले होते.
सलमान खान काही दिवसांपूर्वी स्पॉट झाला होता. त्यावेळी त्याचे अचानक वजन कमी झाल्याचे पाहून चाहते चिंतेत पडले होते. सलमानला काही आरोग्यविषयक समस्या तर नाही ना, असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. मात्र, आता सलमानने स्वतःच खुलासा केला आहे की त्याचे तब्बल 16 किलो वजन कमी झाले आहे.
सलमानचे 16 किलो वजन झाले कमी
सलमान त्याचा भाऊ सोहेल खानला भेटण्यासाठी ‘अलायन्स’ शोमध्ये गेला होता. यावेळी सलमान सोहेलशी बोलताना म्हणतो की, “तू खूप वजन कमी केलं आहेस.” त्यानंतर सोहेल आपले सिक्स-पॅक एब्स दाखवत सांगतो की, त्याने 12 किलो वजन कमी केले आहे.
यावर सलमान म्हणतो की, “माझं स्वतःचं 16 किलो वजन कमी झालं आहे.” सलमानची ही गोष्ट ऐकून तिथे उपस्थित असलेले सर्वजण आश्चर्यचकित होतात.
सलमानने आरोग्यावरून चाहत्यांची घेतली होती फिरकी
सलमानचे वजन कमी झाल्यानंतर त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्याच्या आरोग्याबाबत सर्वत्र चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर सलमानने स्वतःचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत चाहत्यांची फिरकी घेतली होती. फोटोसोबत त्याने लिहिले होते, “तुमच्या सर्वांची तब्येत कशी आहे?”
सलमान गेल्या काही काळापासून सोशल मीडियावरही चांगलाच सक्रिय आहे. तो नियमितपणे विविध पोस्ट शेअर करत असतो. नुकताच त्याने जिममधील वर्कआउटनंतरचा शर्टलेस फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये तो आरशाकडे पाहताना दिसत होता.
हा फोटो शेअर करत सलमानने लिहिले होते, “सलमान खान डर गया... हम्म्मम... जो डर गया वो मर गया.”
सलमानची प्रोफेशनल लाइफ
सलमान खान शेवटचा ‘सिकंदर’ या चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट 2025 मध्ये प्रदर्शित झाला होता. मात्र, बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यानंतर सलमानने ‘राजा शिवाजी’ या चित्रपटात कॅमिओ केला होता.
आता सलमान ‘मातृभूमि’ या चित्रपटात दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत चित्रांगदा सिंह मुख्य भूमिकेत आहे. सलमान आणि चित्रांगदा पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत.
या चित्रपटाचे आधीचे नाव ‘बॅटल ऑफ गलवान’ असे होते. मात्र, नंतर चित्रपटाचे नाव बदलून ‘मातृभूमि’ करण्यात आले. चित्रपटातील आतापर्यंत अनेक गाणी रिलीज झाली आहेत. मात्र, अद्याप सिनेमाच्या रिलीज डेटबाबत अधिकृत अपडेट समोर आलेले नाही. त्यामुळे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
‘बिग बॉस’मध्ये पुन्हा दिसणार सलमान
याशिवाय सलमान खान ‘बिग बॉस’ या लोकप्रिय रिअॅलिटी शोमध्येही दिसणार आहे. तो पुन्हा एकदा शोचा होस्ट म्हणून परतणार आहे. यावेळी ‘बिग बॉस’चा 20वा सीझन असणार आहे.
‘बिग बॉस’चा होस्ट म्हणून सलमान खानला प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळते. त्यामुळे यंदाच्या सीझनमध्ये कोणते सेलिब्रिटी सहभागी होणार, याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.