

bollywood hera pheri 3 controversy akshay kumar sent a legal notice to paresh rawal
मुंबई : पुढारी ऑनलाईन
हेराफेरी चित्रपटाच्या पहिल्या पार्टने प्रेक्षकांना चित्रपटगृहात खुर्चीत खिळवून ठेवले होते. त्यातील अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल या तिकडीने चांगलीच कॉमेडी केली होती. त्यांचा दुसरा पार्ट 'फिर हेरा फेरी' ही चांगला चालला. मात्र आता 'हेरा फेरी ३' हा चित्रपट वादात सापडला आहे. त्यात सर्वात महत्वाचे म्हणले परेश रावल यांनी म्हणजेच बाबू भायने 'हेरा फेरी-३' सोडण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे हा चित्रपट चित्रिकरणाच्या आधीच चर्चेत आला आहे.
'हेरा फेरी-३' मधून अचानक परेश रावल यांनी बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. यानंतर चित्रपटाचा निर्माता आणि मुख्य भूमिकेत असलेला अभिनेता अक्षय कुमारने परेश रावल यांना २५ कोटी रूपयांच्या नुकसानभरपाईची नोटीस पाठवली आहे.
या संपूर्ण प्रकरणावर चित्रपटाचे दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी अक्षय कुमारच्या बाजुने विधान केले आहे. परेश रावलने चित्रपट सोडण्यापूर्वी मला कोणत्याही प्रकारची माहिती दिली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
काही दिवसांपासून अशी चर्चा सुरू होती की, प्रियदर्शन आणि परेश रावल यांच्यात काहीतरी बिनसले आहे. त्यामुळे परेश रावलने चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र नंतर परेश रावल यांनी माझ्यात आणि प्रियदर्शनमध्ये कोणतेही मतभेद नाहीत यापूर्वीही आम्ही अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे आणि करत राहू असे म्हटले होते. तसेच माझ्या मनात प्रियदर्शन यांच्याविषयी प्रेम आणि आदर असल्याचे त्यांनी म्हटले होते.
दुसऱ्या बाजुला प्रियदर्शन यांनी यावर बोलताना परेश रावल यांनी चित्रपट सोडण्यापूर्वी माझ्याशी कोणतीही चर्चा केली नाही. किंवा माहिती दिली नसल्याचे म्हटले आहे. अक्षय कुमारच्या नोटीसवर बोलताना ते म्हणाले की, अक्षयने आपल्या कष्टाचे पैसे या चित्रपटासाठी लावले आहेत. अक्षय कुमारने फिरोज नाडियाडवालाकडून या चित्रपटाचे हक्कही विकत घेतल्याचे त्यांनी सांगितले.
आगामी चित्रपट 'भूत बंगला' मध्ये अक्षय कुमार आणि परेश रावल यांचे दिग्दर्शन केल्यानंतर प्रियदर्शन 'हेरा फेरी- ३' मध्ये एकत्र काम करणार होते. प्रियदर्शन म्हणाले, चित्रपट सुरू होण्यापूर्वी अक्षयने मला सांगितले होते की, मी परेश रावल आणि सुनिल शेट्टी याच्याशी चर्चा करावी. मी या दोघांशी चर्चा करून या चित्रपटात काम करण्यासाठी तयार आहात का? असे विचारले होते. त्यावर या दोघांनीही आम्ही तयार असल्याचे सांगितले होते. मला समजत नाही की अचानक काय झाले? परेश रावल यांनी याबाबत माझ्याशी कोणतीही चर्चा केलेली नाही.
एका वृत्तसंस्थेने अक्षय कुमार यांच्या कायदेशीर नोटीशीबद्दल विचारले असता या विषयी परेश रावल यांनी मला या विषयी काही माहिती नसल्याचे उत्तर दिले आहे.