

bollywood emraan hashmi film awarapan song to phir aao written by this lyricst read here
पुढारी ऑनलाईन : Awarapan Songs: इमरान हाशमीच्या ‘आवारापन’ चित्रपटातील ‘तो फिर आओ’, ‘तेरा मेरा रिश्ता पुराना’ ही गाणी या गीतकाराने लिहिली होती. इमरानच्या करिअरमधील अनेक सुपरहिट गाणी लिहिणाऱ्या या गीतकाराचे नाव ओळखा..
इमरान हाशमी सध्या आपल्या ‘आवारापन 2’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाका करत आहे. या चित्रपटात मागील ‘आवारापन’ चित्रपटातील काही दृश्ये आणि जुनी गाणी वापरण्यात आली आहेत. इमरान जेव्हा स्क्रीनवर दिसतो, तेव्हा पार्श्वभूमीवर ‘तो फिर आओ’ हे गाणे वाजू लागते. चित्रपटात ‘तेरा मेरा रिश्ता पुराना’ हे गाणेही ऐकायला मिळते. पण तुम्हाला माहिती आहे का, ही गाणी नेमकी कोणी लिहिली होती? तब्बल 19 वर्षांनंतरही ही गाणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चला जाणून घेऊया ही गाणी लिहिणाऱ्या गीतकाराबद्दल.
‘आवारापन’च्या गाण्यांनी उमटवली वेगळी छाप
2007 मध्ये इमरान हाशमीचा ‘आवारापन’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला, मात्र त्यातील गाणी कल्ट ठरली. ‘तो फिर आओ’ आणि ‘तेरा मेरा रिश्ता पुराना’ या गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनावर खोलवर छाप पाडली.
ही गाणी वाजली की इमरान हाशमीच्या पात्राचे दुःख, विरह आणि आपल्या प्रिय व्यक्तीपासून दुरावल्याची तगमग पडद्यावर स्पष्टपणे दिसत होती. सोशल मीडिया आणि रील्सचा ट्रेंड नसलेल्या काळातही ही गाणी लोकांच्या मनात घर करून राहिली.
चित्रपटात ही गाणी इमरान हाशमीवर ज्या पद्धतीने चित्रित करण्यात आली होती, ती आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. विशेषतः कब्रस्तानात अभिनेता रडत गाण्यावर लिपसिंक करताना दिसतो, तेव्हा जणू तो स्वतःच त्या गाण्याच्या भावना जगत असल्याचा भास होतो. या चित्रपटातील गाणी सईद कादरी यांनी लिहिली होती, तर ती पाकिस्तानी गायक मुस्तफा जाहिद यांनी गायली होती.
सईद कादरी यांनी लिहिली आहेत अनेक हिट गाणी
गुलजार आणि जावेद अख्तर यांसारख्या लोकप्रिय गीतकारांच्या तुलनेत सईद कादरी यांचे नाव कदाचित तितके प्रसिद्ध नसेल. मात्र त्यांची गाणी ऐकल्यानंतर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.
सईद कादरी यांनी इमरान हाशमीवर चित्रित झालेली अनेक लोकप्रिय आणि हिट गाणी लिहिली आहेत. त्यांनी ‘वो लम्हें वो बातें’, ‘अनवर’ चित्रपटातील ‘मौला मेरे मौला’, ‘मर्डर 2’मधील ‘फिर मोहब्बत करने चला है दिल’, ‘हमारी अधूरी कहानी’मधील ‘हमनवा’ आणि ‘मर्डर’मधील ‘भीगे होंठ तेरे’ यांसारखी अनेक संस्मरणीय गाणी लिहिली आहेत.
पाकिस्तानी गायकाने गायली इमरानसाठी ही गाणी
‘आवारापन’मधील गाणीही सईद कादरी यांनीच लिहिली आहेत. तब्बल 19 वर्षांपूर्वी पाकिस्तानी गायक मुस्तफा जाहिद यांनी ही गाणी गायली होती.
अलीकडेच एका मुलाखतीत मुस्तफा जाहिद यांनी ‘तो फिर आओ’ या गाण्याच्या पहिल्या ओळीबद्दल सांगितले. त्यांनी म्हटले की, या गाण्याची पहिली ओळ त्यांनीच लिहिली होती. ही ओळ त्यांनी आपल्या मित्रांना ऐकवली तेव्हा त्यांना ती फारशी आवडली नव्हती. मात्र आपल्याला स्वतःला पुन्हा मिळवण्याची तगमग कशी असते, याची त्यांना जाणीव होती. त्यामुळे त्या प्रसंगासाठी ही ओळ अगदी योग्य असल्याचा त्यांना विश्वास होता. तब्बल 19 वर्षांनंतरही ‘आवारापन’ची ही गाणी चर्चेत आहेत. आजच्या Gen-Z प्रेक्षकांनाही ही गाणी मोठ्या प्रमाणात आवडत आहेत.