

shehzad poonawalla explains why he quit bjp spokesperson does not get a salary
पुढारी ऑनलाईन : यापूर्वी पूनावाला यांनी ३१ जुलै रोजी ‘एक्स’वरील आपला बायो बदलला होता. नव्या बायोमध्ये भाजपचा उल्लेख नव्हता. त्यानंतर त्यांच्या पक्ष सोडण्याच्या चर्चांना उधाण आले होते. आता त्यांनी स्वतः याबाबतची स्थिती स्पष्ट केली आहे.
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते राहिलेले शहजाद पूनावाला यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याने ते चर्चेत आले आहेत. आता त्यांनी पक्षाचा राजीनामा देण्यामागचे कारणही स्पष्ट केले आहे. एका मुलाखतीत शहजाद पूनावाला यांनी सांगितले की, पक्षाच्या प्रवक्त्यांना पगार मिळत नाही आणि हे एक स्वयंसेवी पद आहे. त्यांनी असेही स्पष्ट केले की, आपण घेतलेल्या निर्णयावर ठाम असून तो बदलणार नाही.
पूनावाला यांनी सोमवारी पक्षाला सांगितले होते की, त्यांनी ३० जुलै रोजी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला आहे. दिलेल्या मुलाखतीत शहजाद पूनावाला यांनी सांगितले की, ते २०२४ पासूनच पक्ष सोडण्याचा विचार करत होते. काम आणि राजकारण यांच्यात समतोल साधताना निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीचा सामना करण्यासाठी त्यांनी पुन्हा आपली जुनी नोकरी करण्याचा निर्णय घेतला.
पगाराची नोकरी की राजकारण? पूनावालांनी सांगितले कारण
आपल्या निर्णयामागचे कारण सांगताना पूनावाला म्हणाले, “मी २०२४ पासूनच याचा विचार करत होतो. यापूर्वी मी सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये होतो आणि ती पगाराची नोकरी होती. ती नोकरी सोडून मी राजकारणाला पूर्ण वेळ दिला. मात्र, जेव्हा मला वाटले की आता मला नोकरी किंवा राजकारण यापैकी एकाची निवड करावी लागेल, तेव्हा मी पुन्हा नोकरी करण्याचा निर्णय घेतला.”
‘प्रवक्त्याला पगार मिळत नाही’
शहजाद पूनावाला यांनी सांगितले की, त्यांनी आपल्या निर्णयाबाबत पक्षाशी चर्चा केली होती. पक्षाच्या नेतृत्वाने त्यांना निर्णयाचा पुन्हा विचार करण्यास सांगितले, मात्र ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले. पूनावाला म्हणाले, “मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. प्रवक्त्याला पगार मिळत नाही. हे एक स्वयंसेवी पद आहे.”
‘भाजपच्या विचारधारेचे समर्थन करत राहीन’
शहजाद पूनावाला यांनी पुढे सांगितले की, भाजपने त्यांना कधीही स्वतःचे मत मांडण्यापासून रोखले नाही. ते म्हणाले, “सत्य हे आहे की केवळ भाजपमध्येच तुम्ही स्वतंत्रपणे आपले मत मांडू शकता. जेव्हा जेव्हा एखादा विषय असायचा, तेव्हा भाजपकडून मला बोलावून चर्चा केली जायची.”
ते पुढे म्हणाले, “मी भाजपसाठी थेट काम करणार नाही, मात्र पक्षाच्या विचारसरणीला आणि विचारधारेला माझा पाठिंबा कायम राहील.”
पूनावाला यांनी असेही म्हटले की, तरुण, मध्यमवर्गीय आणि राजकारणात येण्याची इच्छा असलेल्या कोणत्याही व्यक्तीसाठी भाजप आजही सर्वोत्तम व्यासपीठ आहे.
पुढे काय करणार शहजाद पूनावाला?
शहजाद पूनावाला यांनी आपल्या पुढील वाटचालीबाबत सोशल मीडियावर काही संकेत दिले आहेत. भाजपच्या राजीनाम्याची अधिकृत घोषणा करण्याच्या एक दिवस आधी त्यांनी इन्स्टाग्रामवर आपल्या नव्या सोशल मीडिया उपक्रमाची ‘द मेनिफेस्टो’ घोषणा केली होती.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश मध्यमवर्गीय नागरिकांच्या समस्या आणि मुद्दे समोर आणणे हा आहे. या व्हिडिओमध्ये पूनावाला यांनी मध्यमवर्गीयांच्या अडचणी मांडल्या. तसेच युरोपसारख्या देशांमध्ये द्यावा लागणारा कर भरूनही भारतीयांना त्याच पातळीचे जीवनमान मिळते का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.