

Badshah Isha Rikhi divorce
मुंबई: प्रसिद्ध रॅपर बादशाह आणि पंजाबी अभिनेत्री ईशा रिखी यांच्या नात्याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या तर्कवितर्कांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. लग्नानंतर अवघ्या पाच महिन्यांतच दोघांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला असून, सोशल मीडियाद्वारे घटस्फोटाची अधिकृत घोषणा केली आहे.
सोमवारी रात्री बादशाह आणि ईशा या दोघांनीही आपापल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पत्र शेअर करत चाहत्यांना या निर्णयाची माहिती दिली. आपल्या पोस्टमध्ये बादशाहने लिहिले, "मी आणि ईशा रिखीने परस्पर संमतीने वेगळे होण्याचा आणि आपापल्या मार्गाने पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय एकमेकांबद्दल आदर ठेवूनच घेण्यात आला आहे. या कठीण काळात सर्वांनी आमच्या गोपनीयतेचा आदर करावा, ही विनंती." पुढे त्याने लिहिले, "या विषयावर आमचे हे एकमेव वक्तव्य असेल. आमच्या नात्याबद्दल यापुढे कोणतेही तर्कवितर्क किंवा अंदाज लावले जाऊ नयेत, ही नम्र विनंती."
जुलै महिन्यापासून या दोघांच्या नात्यात कटुता आल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्यातच ईशाने बादशाहसोबतचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर करत एक गूढ कॅप्शन लिहिले होते. "प्रत्येक वादळ एक धडा शिकवून जाते, आणि प्रत्येक प्रार्थना ही एक आशा असते," अशा आशयाची पोस्ट लिहीत तिने 'हार्ट ब्रेक'चा इमोजी वापरला होता.
त्यानंतर ईशाच्या आईनेही 'कर्म' या विषयावर काही पोस्ट्स शेअर केल्यामुळे या संशयाला बळ मिळाले होते. दरम्यान, आगामी ‘बिग बॉस २०’ या रिअॅलिटी शोमध्ये ईशा सहभाग घेणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच त्यांच्या घटस्फोटाची बातमी समोर आली आहे.
बादशाहचे हे दुसरे लग्न होते. यापूर्वी त्याचे लग्न जॅस्मिन मसीह हिच्याशी झाले होते. २०२० मध्ये त्यांचा अधिकृत घटस्फोट झाला. त्यांना जेसेमी नावाची मुलगीही आहे. आता ईशासोबतच्या या निर्णयामुळे बादशाह पुन्हा एकदा चर्चेत आला असून, दोघांनीही यापुढे आपल्या वैयक्तिक आयुष्यावर कोणतीही चर्चा न करण्याचे आवाहन चाहत्यांना केले आहे.