

मराठी चित्रपटसृष्टीकडे हिंदीतील कलाकार आणि निर्मात्यांचा वाढता कल गेल्या काही काळापासून पाहायला मिळतोय. आता या यादीत अभिनेता रजत बेदी यांचंही नाव जोडलं गेलं आहे. हिंदीसह दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलेले रजत बेदी आता मराठी सिनेमाशी जोडले गेले आहेत. आगामी ‘बंधू’ या मराठी चित्रपटाचे ते प्रस्तुतकर्ते आहेत.
हिंदी सिनेमाचा समृद्ध वारसा
रजत बेदी हे ज्येष्ठ दिग्दर्शक-निर्माते नरेंद्र बेदी यांचा मुलगा, तर प्रसिद्ध उर्दू साहित्यिक, पटकथाकार आणि दिग्दर्शक राजिंदर सिंह बेदी यांचे नातू आहेत. त्यामुळे चित्रपटसृष्टीचा मोठा वारसा त्यांच्या कुटुंबाला लाभला आहे.
राजिंदर सिंह बेदी यांनी आपल्या लेखनातून हिंदी चित्रपटांना अनेक दर्जेदार कथा दिल्या. ‘मधुमती’, ‘अभिमान’, ‘अनुपमा’, ‘सत्यकाम’, ‘देवदास’ आणि ‘एक चादर मैली सी’ यांसारख्या चित्रपटांशी त्यांचं नाव जोडलेलं आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. तर नरेंद्र बेदी यांनी दिग्दर्शक म्हणून हिंदी सिनेमात स्वतःची ओळख निर्माण केली. ‘बंधन’, ‘जवानी दिवानी’, ‘खोटे सिक्के’, ‘बेनाम’, ‘रफू चक्कर’ आणि ‘सनम तेरी कसम’ यांसारखे चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचे टप्पे ठरले. अमिताभ बच्चन यांच्या प्रमुख भूमिका असलेले ‘बेनाम’ आणि ‘अदालत’ हे त्यांचे चित्रपटही बॉक्स ऑफिसवर मोठे यशस्वी ठरले होते.
‘बंधू’च्या माध्यमातून मराठी चित्रपटात एन्ट्री
रजत बेदी प्रस्तुत ‘बंधू’ हा चित्रपट जे एस् डी स्टुडिओ आणि ट्राईफ्लिक्स एंटरटेंमेंट यांच्या सहकार्याने तयार करण्यात आला आहे. हा चित्रपट २० नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन नितीन सिंधूविजय सुपेकर यांनी केलं आहे. प्रणव देसाई, जुही देसाई आणि कुलदीप सुनील ओझा यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.
मॉडेलिंगपासून सुरू झालेला प्रवास
रजत बेदी यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात मॉडेलिंगमधून केली. १९९४ मध्ये त्यांनी ‘ग्लॅडरॅग्स मॅनहंट स्पर्धा’ जिंकली आणि त्यानंतर अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल टाकलं. ‘२००१: दो हजार एक’ या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. मात्र, हृतिक रोशनच्या ‘कोई मिल गया’मधील भूमिकेमुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर ओळख मिळाली. यानंतर ‘जोडी नंबर १’, ‘द हिरो: लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय’, ‘रक्त’, ‘अक्सर’, ‘पार्टनर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या.
हिंदीपुरताच त्यांचा अभिनयाचा प्रवास मर्यादित राहिला नाही. तमिळ, तेलुगू, कन्नड आणि पंजाबी चित्रपटांमध्येही रजत बेदी यांनी काम केलं आहे. नुकतंच शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान दिग्दर्शित ‘Bads of Bollywood’ या मालिकेतून त्यांनी अभिनय क्षेत्रात कमबॅक केलं. या नव्या भूमिकेमुळे त्यांची पुन्हा एकदा चर्चा झाली.
"माझ्या आयुष्यात मला नेहमीच ज्या चित्रपटांचा खूप अभिमान वाटेल, त्यापैकीच हा एक चित्रपट आहे. तो कसा चालेल हे मला माहित नाही; ते प्रेक्षकांच्या हातात आहे, पण यातील आशयाचा (कथेचा) मला प्रचंड अभिमान आहे," असेही त्याने नमूद केले. रजत म्हणाले, मी महाराष्ट्रातच लहानाचा मोठा झाल्यामुळे, या कथेसोबत त्याचे एक विशेष नाते आहे. माझा जन्मही महाराष्ट्रातच झाला आणि आज मी एक मराठी चित्रपट सादर करत आहे, याचा मला अभिमान वाटतो. मला मराठी समजते आणि मी थोडीफार मराठी बोलूही शकतो.