Awarapan 2 Review: इम्रान हाश्मीचा 'अवारपन 2' कसा आहे, तो थिएटरमध्ये पाहण्यासारखा आहे की नाही? जाणून घ्या रिव्ह्यू आणि रेटिंग

Awarapan 2 Review: इमरान हाश्मीचा ‘आवारापन 2’ चित्रपटगृहात दाखल झाला असून, भावनिक कथा, दमदार अभिनय आणि जुन्या भागाची आठवण करून देणाऱ्या संगीतामुळे चित्रपट लक्ष वेधून घेतो.
Awarapan 2 Review
Awarapan 2 ReviewPudhari
Published on
Updated on

Awarapan 2 Review: इमरान हाश्मीच्या चाहत्यांसाठी अखेर ‘आवारापन 2’ चित्रपटगृहात दाखल झाला आहे. 2007 मध्ये आलेल्या ‘आवारापन’ने आपल्या भावनिक कथेने, दमदार अभिनयाने आणि लक्षात राहणाऱ्या गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली होती. त्यामुळे दुसऱ्या भागाकडूनही मोठ्या अपेक्षा होत्या. ‘आवारापन 2’ हा चित्रपट भावनिक आणि मनोरंजक आहे, मात्र पहिल्या भागाची जादू पूर्णपणे पुन्हा निर्माण करण्यात तो काहीसा कमी पडतो.

‘आवारापन 2’ची कथा नेमकी काय?

चित्रपटाची कथा शिवमच्या आयुष्याभोवती फिरते. इमरान हाश्मी पुन्हा एकदा शिवमची भूमिका साकारत आहे. त्याच्या आयुष्यात आलियाची एन्ट्री होते आणि त्यानंतर अनेक घटना घडत जातात. शिवम आणि आलियाची भेट कशी होते, त्यांच्या नात्यात कोणते बदल होतात आणि पुढे त्यांचं आयुष्य कोणत्या दिशेने जातं, हे चित्रपट पाहिल्यानंतरच समजतं. कथेचा मोठा भाग भावनिक नातेसंबंध आणि शिवमच्या आयुष्यातील संघर्षाभोवती फिरतो.

पहिला ‘आवारापन’ पाहिला असेल तर अधिक मजा येईल

‘आवारापन 2’ पाहण्याआधी पहिला भाग पाहिलेला असेल तर चित्रपटातील अनेक संदर्भ आणि शिवमच्या व्यक्तिरेखेतील भावनिक बाजू अधिक चांगल्या प्रकारे समजते. पहिल्या भागात शिवमच्या आयुष्यातील वेदना आणि त्याचा संघर्ष पाहायला मिळाला होता. त्याच पार्श्वभूमीमुळे दुसऱ्या भागातील त्याची व्यक्तिरेखा अधिक प्रभावी वाटते. म्हणूनच ज्यांनी पहिला भाग पाहिलेला आहे, त्यांच्यासाठी या सिक्वेलचा अनुभव अधिक भावनिक ठरू शकतो.

इमरान हाश्मीने पुन्हा जिंकली मनं

इमरान हाश्मीने शिवमच्या भूमिकेत पुन्हा एकदा गंभीर आणि इंटेन्स अभिनय करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा लूक आणि अभिनय या व्यक्तिरेखेला शोभून दिसतो. दिशा पाटनीनेही आलियाची भूमिका चांगल्या पद्धतीने साकारली आहे. मात्र या दोघांपेक्षा पूरन गब्बी यांचा अभिनय लक्ष वेधून घेतो.

चित्रपटातील जोरावरची भूमिका त्यांनी दमदारपणे साकारली आहे. त्यांच्या अभिनयामुळे अनेक प्रसंग अधिक प्रभावी झाले आहेत. ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांची उपस्थितीही चित्रपटाला वेगळी ताकद देते.

कथा फार प्रेडिक्टेबल वाटते का?

सिक्वेल म्हटलं की कथा आधीच्या भागासारखीच असेल का, असा प्रश्न साहजिकच पडतो. मात्र ‘आवारापन 2’मध्ये कथा पूर्णपणे सरळ रेषेत पुढे जात नाही. काही प्रसंगांमध्ये पुढे काय होणार हे प्रेक्षकांना जाणवू शकतं. मात्र जेव्हा कथा प्रेडिक्टेबल वाटायला लागते, तेव्हा काही ठिकाणी मेकर्स ट्विस्ट आणतात. चित्रपटात फार मोठ्या प्रमाणात ट्विस्ट नाहीत, पण कथा अनावश्यकपणे लांबवलीही गेलेली नाही. त्यामुळे चित्रपटाचा वेग बऱ्यापैकी टिकून राहतो.

गाणी आणि बॅकग्राउंड म्युझिक

‘आवारापन’ म्हटलं की त्याची गाणी आठवल्याशिवाय राहत नाहीत. पहिल्या भागातील गाण्यांनी चित्रपटाच्या भावनिक प्रभावात मोठी भूमिका बजावली होती. ‘आवारापन 2’मध्येही संगीत आणि बॅकग्राउंड स्कोअरला महत्त्व देण्यात आलं आहे. गाणी ऐकताना जुन्या ‘आवारापन’च्या आठवणी पुन्हा जाग्या होतात.

काही प्रसंगांमध्ये गाणी आणि बॅकग्राउंड म्युझिकमुळे भावनिक वातावरण अधिक प्रभावी होतं. त्यामुळे पहिल्या भागाशी जोडलेल्या प्रेक्षकांसाठी हा नॉस्टेल्जिया खास ठरू शकतो. चित्रपटात श्रेया सरनचा कॅमिओ देखील आहे. तिच्या उपस्थितीमुळे जुन्या भागाशी जोडलेल्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळतो.

Awarapan 2 Review
Disha Patani First look|'शिवम इज बॅक!' १७ वर्षांनंतर इमरान हाश्मी पुन्हा त्याच अंदाजात; 'आवारापन-२'चा दिशाचा 'हा' लूक पाहिलात का?

मग ‘आवारापन 2’ पाहावा की नाही?

जर तुम्हाला इमरान हाश्मीचा अभिनय आवडत असेल आणि पहिला ‘आवारापन’ तुम्हाला आवडला असेल, तर ‘आवारापन 2’ एकदा थिएटरमध्ये पाहता येऊ शकतो.

चित्रपटात प्रेम आहे, अॅक्शन आहे, नात्यांचा संघर्ष आहे आणि जुन्या भागाची आठवण करून देणारे क्षणही आहेत. मात्र पहिल्या भागाच्या तुलनेत प्रत्येक बाबतीत हा चित्रपट तितकाच प्रभावी ठरत नाही. विशेषतः क्लायमॅक्स आणि काही ट्विस्ट अधिक दमदार असते तर चित्रपटाचा परिणाम आणखी चांगला झाला असता, असं जाणवतं.

‘आवारापन 2’ रेटिंग: ⭐⭐⭐ 3/5

मरान हाश्मीच्या चाहत्यांना आणि पहिल्या भागाशी भावनिक नातं असलेल्या प्रेक्षकांना हा चित्रपट आवडण्याची शक्यता आहे. मात्र पहिल्या ‘आवारापन’सारखी जादू आणि प्रभाव अपेक्षित ठेवून गेलात, तर निराशा होऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news