

Asha Bhosle Passes Away
मुंबई : गेल्या आठ दशकांमधून आपल्या आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध करणाऱ्या जेष्ठ गायिका आशा भोसले यांचे आज निधन झाले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना शनिवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आशा भोसले यांच्या निधनाने संपूर्ण संगीतसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
आशा भोसले यांचे चिरंजीव आनंद भोसले यांनी सांगितले की, त्यांची आई आणि ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना शनिवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांचे अवयव निकामी होत गेले, त्यामुळे त्यांचं निधन झालं उद्या (सोमवारी) सकाळी ११ ते २ या वेळेत त्या लोअर परळ या ठिकाणी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. दुपारी ४ वाजता शिवाजी पार्क या ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
आशा भोसले यांच्या निधनाची माहिती देताना मंत्री आशिष शेलार म्हणाले की, "आज संपूर्ण देशासह महाराष्ट्र आकंठपणे दुःखात बुडाला आहे. एका युगाचा अंत झाला आहे. आशाताई आपल्यातून निघून गेल्या आहेत. आशाताईंचं असणं हे वर्षानुवर्षे समाधानाची अनुभूती देत होतं. आपण दुःखाला कवटाळून लोकांना आनंद देणं ही त्यांची खासियत होती. त्यांचं कर्तृत्व जगाला वेड लावणारं होतं. अशा आशाताई आज आपल्यात राहिल्या नाहीत. आता कुटुंबाने सांगितल्याप्रमाणे उद्या त्यांचं पार्थिव त्यांच्या लोअर परळ येथील निवासस्थानी ठेवण्यात येईल. तिथे लोकांना अंत्यदर्शन घेता येईल. त्यानंतर शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात येतील. शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांचं नसणं हे आपल्याला आयुष्यभर दुःख देणारं आहे."
आशा भोसले यांच्या निधनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे की, तीन वर्षांपूर्वी धडाक्यात नव्वदी साजरी करणार्या ज्येष्ठ गायिका, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण आशाताई भोसले यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. त्यांच्या निधनाने मंगेशकर घराण्यातील लतादिदींनंतर आणखी एक तारा निखळला आहे. सुरांची सुंदर बाग आज उजाड झाली.
आशाताईंचा आवाज म्हणजे संगीताचा आत्मा होता. गायनातील बारमाही हिरवा ऋतू आणि भावभावनांचा सुरेल असा महासागर म्हणजे आशाताई. ‘तोरा मन दर्पण कहलाए’ अशा भावपूर्ण गाण्यापासून ‘खल्लास’पर्यंत अनेक मूडची गाणी लीलया गाणार्या आशाताई भोसले यांनी भक्तिगीत, भावगीत, नाट्यसंगीत, गझल, शास्त्रीय संगीत, रवींद्र संगीत, लोकगीते, पॉप असे अनेक संगीत प्रकारांचे गायन करताना त्यावर आपला वेगळा ठसा उमटवला. मराठी, हिंदी, बांगलासह 20 भारतीय भाषा आणि विदेशी भाषांमध्ये 12,000 वर गाणी त्यांनी गायली. ‘महाराष्ट्र भूषण’सारखा ‘बांगला विभूषण’ पुरस्कारही त्यांना बहाल केला गेला. बदलांना सहजरित्या आत्मसात करणार्या अशा अष्टपैलू गायिका पुन्हा होणे नाही. अलिकडेच जागतिक रेडिओ दिनाच्या कार्यक्रमात आम्ही सोबत होतो, त्यांनी आग्रह करुन ‘अभी ना जाओ छोडकर...’ हे गाणे माझ्याकडून गाऊन घेतले होते आणि ‘पहा मी मुख्यमंत्र्यांना गाणं गायला लावले’, असे म्हणाल्याही होत्या. त्या आशाताईंचा सहवास आता आपल्याला लाभणार नाही, ही कल्पनाच करवत नाही.मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि देशभरातील असंख्य चाहत्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
वयाची नव्वदी ओलांडली असली तरी आशाताईंचा उत्साह आजही तरुणांना लाजवणारा होता. २०२३ मध्ये आपल्या ९० व्या वाढदिवसाला त्यांनी दुबईत तीन तासांचा लाईव्ह कॉन्सर्ट केला होता. त्या वेळी त्यांनी म्हटले होते की, "संगीत हाच माझा श्वास आहे. संगीतामुळेच मी कठीण प्रसंगांवर मात करू शकले."आशा भोसले यांना त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, २००० मध्ये 'दादासाहेब फाळके पुरस्कार' आणि २००८ मध्ये 'पद्मविभूषण' देऊन सन्मानित करण्यात आले होते.