मुंबई : प्रत्येक कलाकाराची काही ना काही प्रेरणा असते. ती प्रेरणा संपली की कलाकार संपतो. कलाकाराकडे असलेल्या आगीत कलेची मशाल जळत असते. ती मशाल जळत राहिली पाहिजे. गाण्याच्या रूपाने मी माझ्यातील मशाल जिवंत ठेवली आहे. मला एका कवीने सांगितले होते की, मनातील कळी उमलू देवू नका, ती कळी उमलली तर ती कोमेजून जाईल. म्हणून आयुष्यात मनाच्या कळीला तरूण ठेवा, म्हातारे झाले की कळी कोमजते. त्यामुळे मनातील कळी तरूण ठेवा, अशा शब्दांत चिरतरूण राहण्याचा सल्ला चिरतरूण गायिका पद्मविभूषण आशा भोसले यांनी दिला.
'स्वरस्वामिनी आशा' या पुस्तकाचे प्रकाशन विले पार्त्यातील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात शुक्रवारी राष्ट्रीय सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आशा भोसले बोलत होत्या. यावेळी ज्येष्ठ गायक पं. हृदयनाथ मंगेशकर, आ. आशिष शेलार, अमेय हेटे, नरेंद्र हेटे व्यासपीठार उपस्थितीत होते. यावेळी आशाताईंची ९१ दिव्यांनी आरती करण्यात आली. पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी भेट दिलेली साडी भागवत यांच्या हस्ते आशाताईंना सुपूर्द करण्यात आली. 'स्वरस्वामिनी आशा' हे पुस्तक व्हॅल्यूएबल ग्रुपची ही प्रस्तुती असून निर्मिती आणि प्रकाशन मेराक इव्हेंटसच्या मंजिरी अमेय हेटे तसेच जिवनगाणीचे प्रसाद महाडकर यांच्या आहे. सहप्रकाशनाची जबाबदारी डिंपल प्रकाशनाची आहे
खान्देशची राजधानी ठाणेरे गावात ८-९ वर्षांच्या आशाताई आणि मी भाकरी, तिखट तेल या अन्नावर अनेक वर्षे जगलो. आशाताई सगळ्यात सुदृढ, मीनाताई कृश, माझा एक पाय कृश, मीनाताई, दीदी मुंबईत पण घरातली सगळी कामे आशाताईला करायला लागायची आणि मला सांभाळणे, माझे सगळे ती करायची, आईही करणार नाही, ते आशाताई करायची, काही ऋण, उपकार आपल्याला फेडता येत नाहीत, त्यातले हे ऋण आहेत, अशा शब्दात ज्येष्ठ गायक व संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांनी आपल्या बहिणीबद्दलचे ऋण व्यक्त केले. यावेळी आशाताई भावूक झाल्याचे पहायला मिळाले.
यावेळी आशाताईंच्या उस्फूर्त, निरागस, निखळ, अवखळ आणि उत्कट स्वभावाचे दर्शनही रसिकांना झाले. या कार्यक्रमात आशाताईंनी आपल्याला घडविलेल्या संगीतकार यशवंत देव, सुधीर फडके आणि पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या गाणी घडतांनाचे अनेक किस्से उदाहरणासह सादर करत रसिकांना भूतकाळातही नेले आणि हुबेहुब नकलांनी रसिकांना मनमुराद हसवलेही. जगात सगळ्यात जास्त रेकॉर्डेड गाणी मी गायली त्यामुळे गिनिज बुकात माझे नाव कसे आले, याची आठवण त्यांनी सांगितली. संगीतकार, गीतकार, तंत्रज्ञ यांचे ऋण त्यांनी व्यक्त केले. महाराष्ट्रातील स्त्रियांनी बाळा जो जो रे... हे गाणं गायलं. त्यामुळे मला हिंदी चित्रपटात गाणी गाण्याची संधी मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
१९५६ मध्ये हृदयनाथ मंगेशकर यांनी मला पहिलेच गाणं चांदणं शिपिंत हे गाणे दिले. १९६६ ला मी खुप त्रासात असतानाही गातच होते, त्यावेळी त्याने जीवलगा हे गाणे दिले. या गाण्यातच त्याची आर्तता येते, संगीतकारांना सुचते कसे, आपल्याला ते का सुचत नाही, असा प्रश्न मला नेहमीच पडतो. बाळ मी तुला सांभाळलं, म्हणून तू अशा सुंदर चाली केल्यास अशी टिप्पणी त्यांनी हृदयनाथ यांना उद्देशून केली.
मला राजकारण कळत नाही, मी राजकारणात शून्य आहे. ८० वर्षांच्या काळात माझ्या करिअरच्या बाबतीत माझ्याशी किती राजकारण झाले ते मला कळलं नाही, पण आता मुलांमुळे मला थोड थोडं कळायला लागल्याची खंत आशाताईंनी व्यक्त केली. मला स्वा. सावरकर, नरेंद्र मोदी, मोहन भागवत मला आवडतात, या सगळ्या माझ्या मंदिरातील मूर्ती आहेत, असे त्या म्हणाल्या. तर देशभक्तीचा संस्कार मंगेशकर कुटुंबीयांच्या संगीताने झाला. संगीत गाणे, हे आपण स्वतःच्या आनंदासाठी ऐकतो, पण व्यथा असो की आनंद आपण संगीत ऐकतो, देशाचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल, तेव्हा त्यात मंगेशकर कुटुंबाच्या संगीतातील योगदानाचा त्यात समावेश असेलच, अशी आशा सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केली.
विघ्नेश जोशी व रेणुका देशकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी जीवनगाणीच्या वतीने आशा भोसले यांनी गायलेली गाणी सादर करण्यात आली. जीवनगाणीचे प्रसाद महाडकर, जॅकी श्रॉफ, पुनम धिल्लो, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, निवेदिता सराफ, गायक सुरेश वाडकर, पद्मजा फेणाणी, रवींद्र साठे, उत्तरा केळकर, अनुराधा पौडवाल, देवकी पंडित, डिंपल प्रकाशनचे अशोक मुळे उपस्थित होते.
या कार्यक्रमात दीदीचा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होणार नाही, असे सांगत आशाताईंना दीदीच्या मोगरा फुलला... मी घरातला भीम आहे. दीदीने आम्हाला सांभाळले, अजूनही ती आम्हांला सांभाळते, आम्ही सगळी भावंडं एका मुठीसारखे आहोत, अशा भावना आशाताईंनी कुटुंबासाठी व्यक्त केल्या. माझ्यावर असे प्रेम राहू द्या, अशी रसिकांना साद घालत आशाताईंनी जीवन एक रंगमंच है... हा रंगमंच मी कधीही सोडेन, थोडे दिनोंका सवाल है... अशा भावना त्यांनी व्यक्त करताच, रसिकांनी नहीं. नही... अभी नही... अशी साद आशाताईंना घातली.