

Nirmal Kapoor dies
मुंबई : दिग्गज चित्रपट निर्माते बोनी कपूर, अभिनेते अनिल कपूर, संजय कपूर यांच्या आई निर्मल सुरिंदर कपूर यांचे २ मे रोजी वयाच्या ९० वर्षी निधन झाले. त्यांनी कोकिलाबेन धीरुबाई अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. अनिल कपूर शुक्रवारी निर्मल यांचे पार्थिव घेऊन घरी पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत संजय कपूर आणि त्यांची बहीण रीना कपूर आणि अर्जुन कपूर उपस्थित होते. शनिवारी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी निर्मल कपूर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.
निर्मल कपूर यांच्या निधनाने बोनी कपूर, अनिल कपूर यांना खूप दुःख झाले आहे. बोनी कपूर यांनी इन्स्टग्रामवर त्यांच्या आईंचा एक फोटो शेअर करत भावूक पोस्ट लिहिली आहे. "२ मे २०२५ रोजी त्यांचे एक प्रेमळ कुटुंब सोबत असताना शांततेत निधन झाले. त्यांच्या पश्च्यात चार मुले, प्रेमळ सुना, एक काळजी घेणारा जावई, ११ नातवंडे, ४ पणतवंडे असा परिवार आहे. त्या जीवनभराच्या अनमोल अशा आठवणी मागे सोडून एक परिपूर्ण आणि आनंदी जीवन जगल्या." असे बोनी कपूर यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
बोनी कपूर यांनी त्यांच्या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे, "त्यांच्या अपार प्रेमाने त्यांना ओळखणाऱ्या सर्वांना प्रभावित केले. त्या सदैव आमच्या हृदयात राहतील. नेहमीच स्मरणात राहतील. त्यांची नेहमीच आठवण येईल. बोनी, अनिल, रीना, संजय, सुनीता, संदीप, महीप, मोहित, अक्षय, सोनम, अर्जुन, रिया, हर्षवर्धन, अंशुला, जान्हवी, शायना, खुशी, आनंद, आशिता, करण, थिया, वायू, ऐरा, युवान यांच्याकडून खूप खूप प्रेम." या पोस्टच्या कॅप्शनमध्ये बोनी कपूर यांनी "मां" असे लिहिले आहे.
निर्मल कपूर यांच्यावर आज ३ मे रोजी विले पार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
दिवंगत निर्माते सुरिंदर कपूर यांच्या पत्नी निर्मल कपूर ह्या कपूर घराण्याच्या प्रमुख होत्या. त्यांना फिल्म इंडस्ट्रीत खूप आदर होता. त्या गेल्या काही वर्षांत कपूर कुटुंबियांच्या कार्यक्रमांत अनेकदा दिसल्या होत्या.