

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर, निर्माते बोनी कपूर व अभिनेते संजय कपूर यांच्या मातोश्री निर्मल कपूर यांचे शुक्रवारी (दि.२) निधन झाले. मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ९० वर्षाच्या होत्या.
सप्टेंबर २०२४ मध्ये निर्मल कपूर यांचा ९० वा वाढदिवस मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला होता. यावेळी अनिल कपूर यांनी आपल्या आईबरोबरचे क्षण कॅमेऱ्यात टिपून ते फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोमध्ये अनिल कपूर यांची पत्नी सुनिता, बोनी कपूर व त्यांची मुलगी जान्हवी, संजय कपूर व त्यांची मुलगी शनया दिसून आली होती. गेल्या काही दिवसांपासून निर्मल कपूर यांची प्रकृती ठिक नसल्याने त्यांना त्यांना मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर शुक्रवारी उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. उद्या शनिवारी (दि.३) मुंबईतील विले पार्ले स्मशानभूमी त्यांच्यावर अत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
निर्मल कपूर या बॉलिवूडचे दिग्गज निर्माते सुरिंदर कपूर यांच्या पत्नी होत. त्यांना बोनी, अनिल, संजय व रीना अशी चार मुले आहेत. सुरिंदर कपूर यांनी मिलेंगे मिलेंगे, लोफर, 'एक श्रीमान एक श्रीमती' यासह अनेक हिंदी चित्रपटांची निर्मिती केली होती. बोनी कपूर यांनीही आपल्या वडिलांप्रमाणे निर्माता म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तर लोकप्रिय अभिनेता म्हणून अनिल कपूर यांचा अजूनही हिंदी चित्रपटसृष्टीत दबदबा आहे.