Amitabh Bachchan Accident : अमिताभ बच्चन यांचा अपघात, 'KBC 18' च्या सेटवर पाय घसरून पडले; गुडघ्याला दुखापत

८३ व्या वर्षी जपली कामाप्रती निष्ठा, एपिसोडचे शुटींग केले पूर्ण
Amitabh Bachchan Accident : अमिताभ बच्चन यांचा अपघात, 'KBC 18' च्या सेटवर पाय घसरून पडले; गुडघ्याला दुखापत
Published on: 
Updated on: 

मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची 'कौन बनेगा करोडपती'च्या मंचावरील एन्ट्री नेहमीच प्रेक्षकांमध्ये प्रचंड ऊर्जा आणि उत्साह निर्माण करणारी ठरते. वयाच्या ८३ व्या वर्षीही जेव्हा ते धावत मंचावर प्रवेश करतात, तेव्हा उपस्थित प्रत्येक जण थक्क होऊन पाहतो. आपल्या दमदार आणि खर्जातील आवाजात कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरू करण्यापूर्वीच 'वय हा केवळ एक आकडा आहे', हे ते आपल्या कृतीतून वारंवार सिद्ध करतात. मात्र, नुकत्याच प्रसारित झालेल्या एका भागात त्यांनी एका अनपेक्षित घटनेचा खुलासा केला. मंचावर धावत प्रवेश करण्याच्या प्रयत्नात पाय घसरल्याने ते खाली पडले आणि त्यांच्या गुडघ्याला दुखापत झाली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपल्या दुखापतीविषयी सांगताना बिग बी म्हणाले, "नेहमीप्रमाणे मी मंचाच्या मध्यभागी उभे राहूनच सुरुवातीचे मनोगत व्यक्त करत असतो; मात्र आज माझ्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. काल चित्रीकरणादरम्यान माझा पाय घसरला आणि जोरात पडल्यामुळे गुडघ्याला मार बसला." आपल्या डाव्या गुडघ्याकडे निर्देश करत त्यांनी हा प्रसंग सांगितला, तेव्हा मंचासमोरील प्रेक्षक काही क्षण स्तब्ध झाले आणि त्यांच्या चेहऱ्यावर महानायकाबद्दलची काळजी स्पष्टपणे दिसू लागली. उपस्थित प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरील चिंता लक्षात येताच, ही दुखापत फारशी गंभीर नसल्याचे सांगत अमिताभ बच्चन यांनी सर्वांना आश्वस्त केले.

या वेळी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, स्पर्धकांशी संवाद साधताना आपण नेहमीप्रमाणे उभेच राहणार आहोत; मात्र सुरुवातीचे मनोगत व्यक्त करण्यासाठी त्यांनी खुर्चीत बसण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या आपल्याला उभे राहण्यात किंचित त्रास जाणवत असल्याचे त्यांनी प्रामाणिकपणे नमूद केले. वयाच्या या टप्प्यावरही कामाप्रती असलेली त्यांची ही अफाट निष्ठा आणि जिद्द पाहून चाहते व प्रेक्षक त्यांचे भरभरून कौतुक करत असून, ते लवकरात लवकर पूर्णपणे बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करत आहेत.

दरम्यान, खेळाचा विचार करता अमिताभ बच्चन यांनी आदल्या दिवसाचे रोलओव्हर स्पर्धक शौर्ज्या दास यांचे हॉटसीटवर उत्साहात स्वागत केले. शौर्ज्या यांनी कमालीची हुशारी, संयम आणि अचूक रणनीतीच्या जोरावर खेळावर आपली मजबूत पकड निर्माण केली. एकामागून एक कठीण प्रश्नांची अचूक उत्तरे देत त्यांनी कौतुकास्पद कामगिरी केली आणि २५ लाख रुपयांच्या मोठ्या रकमेपर्यंत मजल मारली.

मात्र, २५ लाख जिंकल्यानंतर ५० लाख रुपयांच्या प्रश्नावर ते द्विधा मनःस्थितीत अडकले. कोणताही धोका न पत्करता त्यांनी खेळ थांबवण्याचा अत्यंत समंजस निर्णय घेतला. अमिताभ बच्चन यांनी ५० लाखांसाठी विचारलेला प्रश्न असा होता— "१९३० च्या दशकात लखनौ विद्यापीठातील एका ग्रंथालयाचे बांधकाम ज्या वास्तुविशारदाकडे सोपवण्यात आले होते, त्यांनी खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय राजधानीची रचना देखील तयार केली होती?" यासाठी वेलिंग्टन, कॅनबेरा, टोरंटो आणि ब्राझिलिया हे पर्याय देण्यात आले होते. खात्रीशीर उत्तर ठाऊक नसल्याने त्यांनी खेळ सोडला; मात्र जाताना त्यांनी व्यक्त केलेला 'कॅनबेरा' हा अंदाज अगदी अचूक ठरला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news