

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा (allu arjun) ब्लॉकबस्टर ‘पुष्पा 2’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एक उच्च दर्जाचा बेंचमार्क स्थापित केला आहे. या ऐतिहासिक यशानंतर, सुपरस्टार त्याच्या पुढच्या चित्रपटासह प्रसिद्धीच्या झोतात आला आहे, ज्यावर चाहत्यांच्या नजरा देखील खिळल्या आहेत. अल्लू अर्जुनचा हा चित्रपट 'पठाण'चा दिग्दर्शक अॅटली बनवत आहेत, ज्याचे नाव सध्या 'A6' असे ठेवण्यात आले आहे. या चित्रपटाबद्दल एक नवीन अपडेट समोर आली आहे, त्यानुसार अल्लू अर्जुनने निर्मात्यांकडून मोठी रक्कम आकारली आहे. एवढेच नाही तर एवढी मोठी फी आकारल्यानंतर तो भारतातील सर्वात महागडा अभिनेता बनला आहे.
आधी असे म्हटले जात होते की, हा दोन नायकांचा चित्रपट असेल. त्यानंतर सलमान खानचे नाव जोडले गेले. रजनीकांत किंवा कमल हासन यांना सोबत घेतले जाईल असेही सांगण्यात आले. पण हे कास्टिंग लॉक होऊ शकले नाही. त्यानंतर अल्लू अर्जुनचे नाव जोडले गेले. सलमानने चित्रपट सोडल्याचे समोर आले. आता असे म्हटले जात आहे की सलमान पुन्हा एकदा चित्रपटात सामील झाला आहे. तो या चित्रपटाचा नायक असेल आणि अल्लू अर्जुन त्याच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच खलनायकाची भूमिका साकाररेल. पण पिंकव्हिलाच्या नवीन रिपोर्टनुसार, अॅटलीचा हा चित्रपट फक्त अल्लू अर्जुनसोबत बनवला जात आहे. यासाठी अल्लू अर्जुनने भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वात मोठा करार केला आहे.
अहवालानुसार, अल्लू अर्जुनने निर्माता सन पिक्चर्ससोबत 175 कोटी रुपयांचा करार केला आहे. त्यासोबतच तो नफ्यातील 15% वाटा देखील घेईल. अल्लू अर्जुनने ऑगस्ट 2025 पासून निर्मात्यांना त्याच्या तारखा दिल्या आहेत. ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान चित्रपटावर काम सुरू करण्याची त्याची योजना आहे.
असे सांगितले जात आहे की, या चित्रपटात VFX चा सर्वाधिक वापर केला जाणार आहे. चित्रपटातून अॅटली एक नवीन जग निर्माण करेल. हा अॅटली आणि अल्लू अर्जुनचा सर्वात महत्त्वाकांक्षी चित्रपट आहे.
अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2’ चित्रपट डिसेंबर 2024 मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने जगभरात 1742 कोटी रुपयांची ऐतिहासिक कमाई केली होती. तर देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 1471 कोटी रुपये कमावले होते.