

पुढारी ऑनलाईन डेस्क : अक्षय कुमार, वीर पहाडिया, सारा अली खान आणि निमरत कौर स्टारर 'स्काय फोर्स' या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीत घौडदौड सुरुच आहे. 'स्काय फोर्स' हा चित्रपट २४ जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली पकड कायम ठेवली आहे. 'स्काय फोर्स' हा या वर्षातील आतापर्यंतचा सर्वात मोठा चित्रपट मानला जात आहे. याहूनही महत्त्वाचे म्हणजे 'स्काय फोर्स' अक्षय कुमारसाठी चांगलाच कमबॅक ठरत आहे. चित्रपटाच्या ९ व्या दिवसाच्या कमाईचे आकडे देखील समोर आले आहेत.
अक्षय कुमार व्यतिरिक्त, 'स्काय फोर्स' वीर पहाडियासाठीही भाग्यवान ठरला आहे. या चित्रपटाद्वारे वीरने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली आहे. एवढेच नाही तर वीर पहाडिया यांनी 'स्काय फोर्स'च्या प्रमोशनमध्ये कोणतीही कसर सोडली नाही. हा अभिनेता त्याच्या पहिल्या चित्रपटासाठी उत्साहाने भरलेला दिसतो. 'सॅकॅनिल्क'च्या ताज्या अहवालानुसार, 'स्काय फोर्स'ने रिलीजच्या 9 व्या दिवशी 5 कोटी रुपये कमावले आहेत. हे आकडे ८ व्या दिवसाच्या आकड्यांपेक्षा चांगले आहेत. तर एकूण 9 दिवसांमध्ये चित्रपटाने 100 कोटींच्या वर कमाई केली आहे.
'स्काय फोर्स'ने आतापर्यंत ९ दिवसांत भारतात ९४.५० कोटी रुपये जमा केले आहेत. निर्मात्यांनी एका अधिकृत पोस्टद्वारे घोषणा केली आहे की 'स्काय फोर्स' ने ८ दिवसांत भारतात १०४.३ कोटी रुपये जमा केले आहेत. निर्मात्यांच्या मते, चित्रपटाने पहिल्या आठवड्यात एकूण ९९.७ कोटींचा गल्ला जमवला आणि रिलीजच्या आठव्या दिवशी चित्रपटाने ४.६ कोटींची कमाई केली. या सर्वांची भर पडल्यास, भारतातील एकूण संकलन १०४.३ कोटी रुपये आहे.
निर्मात्यांनी शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, 'स्काय फोर्स' हा २०२५ सालचा १०० कोटींच्या क्लबमध्ये पोहोचणारा पहिला चित्रपट ठरला आहे. याआधी अजय देवगणचा आझाद, कंगना राणौतचा इमर्जन्सी आणि सोनू सूदचा फतेह हे चित्रपटही प्रदर्शित झाले होते. पण तिन्ही चित्रपट १०० कोटींच्या क्लबमध्ये आपले स्थान निर्माण करू शकले नाहीत.