

आपल्या नृत्य अदाकारीने प्रेक्षकांची नजर खिळवून ठेवणाऱ्या अभिनेत्री नृत्यांगना संध्या शांताराम यांचे निधन झाले आहे. त्या 94 वर्षांच्या होत्या. पिंजरा सिनेमातील त्यांच्या कामाचे दाखले आजही दिले जातात. आशिष शेलार यांनी x प्लॅटफॉर्मवरुन संध्या यांना श्रद्धांजली वाहणारी पोस्ट शेयर केली आहे. ते आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, ‘‘पिंजरा’ चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री संध्या शांताराम जी यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी आपल्या अप्रतिम अभिनय आणि नृत्यकौशल्याने प्रेक्षकांच्या मानावर एक वेगळी छाप पाडली. ‘झनक झनक पायल बाजे’, ‘दो आंखें बारह हाथ’ आणि विशेषत: ‘पिंजरा’ चित्रपटामधील त्यांची अजरामर भूमिका प्रेक्षकांच्या मनात कायम स्मरणात राहील. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो !’ (Latest Entertainment News)
संध्या यांना नृत्यप्रधान सिनेमांनी खास ओळख दिली. झनक झनक पायल बाजे, नवरंग या सिनेमासाठी त्यांनी गोपी कृष्ण यांच्याकडून नृत्याचे शिक्षण घेतले.
नवरंग सिनेमातील 'आधा है चंद्रमा, रात आधी' असो किंवा 'अरे जा रे हट नटखट' या गाण्यांमधील त्यांच्या अदाकारीचे त्यावेळी कौतुक झाले होते.
व्ही. शांताराम यांनी त्यांच्या आयुष्यात तीन विवाह केले. त्यांची तिसरी पत्नी संध्या या मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री व कुशल नर्तिका होत्या. दुसरी पत्नी जयश्री यांच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर अवघ्या एका महिन्यात त्यांनी संध्या यांच्याशी विवाह केला होता. संध्या यांनी फारसे चित्रपट केले नसले, तरी त्यांनी साकारलेल्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत.
संध्या यांनी व्ही. शांताराम यांच्यासोबत ‘दो आंखें बारह हाथ’ या चित्रपटात काम केले होते. याशिवाय त्यांनी ‘झनक झनक पायल बाजे’ आणि ‘जल बिन मछली नृत्य बिन बिजली’ सारख्या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या.
‘पिंजरा’ या सिनेमा त्यांच्यासाठी आयकॉनिक ठरला. या सिनेमातील त्यांची तमाशा नर्तकीची भूमिका सर्वाधिक गाजली आणि आजही ती मराठी चित्रपटसृष्टीत अजरामर मानली जाते. संध्या यांची अंत्ययात्रा शनिवारी सकाळी १०.३० वाजता परळ येथील राजकमल स्टूडिओ येथून काढण्यात आली. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क येथील वैकुंठधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते.