

Actor Raju Talikote Passes Away
मुंबई - प्रसिद्ध साऊथ अभिनेता राजू तालिकोटे यांचे चित्रपटाच्या शूटिंगवेळी हार्ट ॲटॅकने निधन झाले. नाटक आणि कन्नड चित्रपटांमध्ये त्यांनी कॉमेडी अभिनेता म्हणून खूप प्रसिद्धी मिळवली होती. ते ५९ वर्षांचे होते. कर्नाटकच्या उडुपी जिल्ह्यातील एका ठिकाणी चित्रपटाच्या शूटिंग सुरु होते. शूटिंग सुरु असतानाच त्यांना हार्ट ॲटॅक आला.
त्यांच्या पश्चात दोन पत्नी, दोन मुले आणि तीन मुली आहेत. त्यांचा मुलगा भरत यांनी माहिती दिली की, राजू तालिकोटे यांना यापूर्वीही हृदयविकाराचा झटका आला होता. पण पुन्हा त्यांना झटका आला.
राजू तालिकोटे यांच्या निधनामुळे कन्नड चित्रपटसृष्टी तसेच रंगभूमी विश्वात शोककळा पसरली आहे. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत म्हटले की, "प्रसिद्ध रंगमंच अभिनेता, हास्य अभिनेता आणि धारवाड रंगायनचे संचालक राजू तालिकोटे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले, हे अत्यंत दुःखद आहे. अनेक कन्नड चित्रपटांमध्ये अभिनय करून अपार लोकप्रियता मिळवलेल्या राजू तालिकोटे यांचे निधन कन्नड फिल्म उद्योगासाठी मोठी हानी आहे."
अभिनेत्री भूमी शेट्टीने त्यांच्या अचानक निघून जाण्याने दुःख व्यक्त केले आहे. एका वेबसाईटशी बोलताना भूमीने सांगितले की, राजू तालिकोटे यांच्या निधनाच्या काही दिवस आधी ती त्यांच्याशी बोलली होती. ती म्हणाली, "मी काल परवा त्यांच्याशी बोलले. ही बातमी ऐकून मला अजूनही धक्का बसला आहे. सुरुवातीला मला विश्वास बसत नव्हता. जेव्हा मी शोधलं की, तेव्हा त्यांच्या मुलाने मला बातमीची पुष्टी केली." शेवटच्या वेळी जेव्हा तिने संवाद साधला तेव्हा राजू ऊर्जा आणि सकारात्मकतेने भरलेला होता. तो नेहमीप्रमाणे विनोद करत होता. त्यांनी कधीही आजारी असल्याचा किंचितही जाणवू दिले नाही. ते आता आपल्यात नाही, ही गोष्ट पचवणे कठीण आहे," असे तिने नमूद केले.