Kangana Ranaut on Supriya Shrinate: काँग्रेस नेत्याची ‘ती’ आक्षेपार्ह पोस्ट; कंगणा राणावत म्हणाली, स्त्री शरीराच्या… | पुढारी

Kangana Ranaut on Supriya Shrinate: काँग्रेस नेत्याची 'ती' आक्षेपार्ह पोस्ट; कंगणा राणावत म्हणाली, स्त्री शरीराच्या...

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा :  काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीणेत यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर अभिनेत्री आणि भाजपच्या हिमाचल प्रदेशच्या मंडीतील लोकसभेच्या उमेदवार कंगना राणावतच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली होती. त्यावर भाजपने तिखट प्रतिक्रिया व्यक्त करत सुप्रिया श्रीणेत यांची पक्षातून हकालपट्टी करणार का, अशी विचारणा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना केली आहे. तर या  प्रकारावर सुप्रिया श्रीणेत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. Kangana Ranaut on Supriya Shrinate

अभिनेत्री आणि भाजपच्या मंडी लोकसभा उमेदवार कंगना राणावत यांच्या विरोधात सुप्रिया श्रीणेत यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आली होती. कंगना राणावत यांना लोकसभेची उमेदवारी मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर केलेल्या या पोस्टमध्ये कंगना राणावत यांचे फोटो आणि त्या फोटोसोबत आक्षेपार्ह मजकूर जोडण्यात आला होता. हा प्रकार लक्षात आल्यानंतर भाजपच्या वतीने सुप्रिया श्रीणेत यांच्यावर कडाडून टीका करण्यात आली. आणि यामुळे भाजप विरुद्ध काँग्रेस असे वाक् युद्ध सुरु झाले. मात्र, एकूण घडलेला प्रकार लक्षात आल्यानंतर स्वतः सुप्रिया श्रीणेत यांनी याबाबतीत स्पष्टीकरण दिले. Kangana Ranaut on Supriya Shrinate

सुप्रिया श्रीणेत म्हणाल्या की, “माझ्या सोशल मीडिया खात्यांचे अधिकार माझ्यासह काही लोकांकडे आहेत. त्यांच्यापैकी कोणाकडून तरी ती घृणास्पद आणि आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली. मात्र, मला ती गोष्ट लक्षात आल्यानंतर तातडीने ती पोस्ट काढून टाकण्यात आली आहे. जे कोणी मला ओळखतात त्यांना माहिती आहे की, एखाद्या स्रीला असे कधीच म्हणणार नाही. तसेच माझ्या नावाचे एक खोटे खाते चालवले जात असून त्यावरुन काही गैरवापर होण्याची शक्यता आहे. ज्याने हा गैरप्रकार केला त्याची तक्रार करण्यात आली आहे,” असेही  त्या म्हणाल्या.

रविवारी आगामी लोकसभेसाठी जाहीर झालेल्या भाजपच्या पाचव्या यादीत हिमाचल प्रदेशच्या मंडी येथून कंगणाला उमेदवारी देण्यात आली. दरम्यान, सुप्रिया श्रीणेत यांच्या सोशल मीडिया खात्यावरून झालेल्या आक्षेपार्ह पोस्टला कंगणा यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले. कंगणाने एक्सवर पोस्ट केली की, “प्रिय सुप्रिया जी, कलाकार म्हणून माझ्या गेल्या २० वर्षांच्या कारकिर्दीत मी सर्व प्रकारच्या महिला भुमिका केल्या आहेत. राणीमधील एका भोळ्या मुलीपासून ते धाकडमधील गुप्तहेरापर्यंत, मणिकर्णिका मधील देवीपासून चंद्रमुखीतील राक्षसापर्यंत, रज्जोमधील वेश्येपासून थलाईवीतील क्रांतिकारक नेत्यापर्यंत. आपण आपल्या मुलींना पूर्वग्रहांच्या बंधनातून मुक्त केले पाहिजे, आपण त्यांच्या शरीराच्या कुतूहलाच्या पुढे गेले पाहिजे. प्रत्येक स्त्री तिच्या सन्मानास पात्र आहे.” असेही कंगणा यांनी लिहीले आहे.

काँग्रेस विरुद्ध भाजप असे वाक्युद्ध यानिमित्ताने झाल्यानंतर या प्रकरणात कोणावर कारवाई होते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा 

Back to top button