पुढारी ऑनलाईन डेस्क : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभ मुहूर्तावर, जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनी यांनी रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनित 'राजा शिवाजी' या चित्रपटाची घोषणा केली. हा चित्रपट मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषेमध्ये असणार आहे. (Raja Shivaji)
संबंधित बातम्या –
या चित्रपटाच्यापाठी एक भक्कम टीम असणार आहे. संगीतकार अजय-अतुल हे या चित्रपटाची हिंदी आणि मराठी गाणी करणार आहेत. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार संतोष सिवन ह्या चित्रपटानिमीत्ताने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत. जिओ स्टुडिओच्या ज्योती देशपांडे आणि मुंबई फिल्म कंपनीची जेनेलिया देशमुख चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.
रितेश देशमुख, म्हणाला, " इतिहासाच्या गर्भात, एक अशी आकृती जन्माला आली जिचे अस्तित्व नश्वरतेच्याही पल्याड होतं. एक प्रतिमा, एक आख्यायिका, जे धगधगत्या प्रेरणेचं चिरंतन अग्नीकुंड होतं. छत्रपती शिवाजी महाराज..फक्त इतिहासपुरुष नाहीत. ती एक भावना आहे, असामान्य शौर्याचा पोवाडा आहे, साडे तीनशे वर्षांपासून..प्रत्येकाच्या मनामनात उगवणारा आशेचा एक महासूर्य आहे. शिवरायांची महागाथा भव्य पडद्यावर जिवंत करता यावी अशी आमची दुर्दम्य महत्वाकांक्षा होती. एका प्रतापी पुत्राच्या महागाथेचा प्रवास ज्याने एका महाकाय सत्तेला उलथवत आणि स्वराज्याचा धगधगता वणवा पेटवला.
संगीतकार अजय-अतुल म्हणाले, " जगाच्या पाठीवर असा एकमेव राजा असेल जो शेकडो वर्षांनंतर आजही आमच्या, हृदयात, श्वासात, रक्तात, धमन्यांत आणि मनामनांत जिवंत आहे. त्यांच्या अद्वितीय आयुष्याची गाथा, त्यांच्या पराक्रमाचा थरार या चित्रपटाच्या माध्यमातून संपूर्ण जगभर पोहोचणार आहे. आमच्या या राजासाठी आजच्या काळात आपण काहीं करू शकतो ही कोणत्याही कलाकारासाठी अत्यंत अभिमानाची भावना असते, तशी सुवर्ण संधी "राजा शिवाजी" या चित्रपटाच्या निमित्ताने आम्हाला मिळते आहे, यासाठी आम्ही स्वतःला खूप भाग्यशाली समजतो."