'नाच गं घुमा'मध्ये झळकणार मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव | पुढारी

'नाच गं घुमा'मध्ये झळकणार मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव

पुढारी ऑनलाईन डेस्क : बहुप्रतीक्षित नाच गं घुमा चित्रपटाच्या चित्रिकरणाला मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर सुरुवात झाली आहे. हा चित्रपट १ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव, सुकन्या मोने, सुप्रिया पाठारे, मधुगंधा कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत ही नावेच केवळ ‘नाच गं घुमा’ नेमका काय व कसा असेल, याची कल्पना देऊन जातात. या नावांवरून चित्रपट महिलांची एक कथा असेल याचा अंदाज येतो.

संबंधित बातम्या –

मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी यांनी चित्रपटाची कथा लिहिली आहे. शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई, तृप्ती पाटील आणि स्वप्नील जोशी चित्रपटाचे निर्माते आहेत. मुक्ता, नम्रता, सुकन्या, सुप्रिया यांच्या अभिनयाने ही कथा बहरणार आहे.

“महिलांच्या अवतीभवती घडणाऱ्या आणि त्यांच्याशी संबंधित अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी यात गुंफल्या गेल्या आहेत. महिलांच्याबाबत गोष्टी साकारताना स्त्रीत्वाचा एक वेगळा पैलू अलगद समोर येतो आणि तिच्या बुद्धीमत्ता-भावनेच्या अचूक मिश्रणावर प्रकाश पडतो. बायकांच्या विविध स्वभाव वैशिष्ट्यांवर आणि त्यांवर आधारित गंमती-जमतींवर चित्रपट बेतला आहे. चित्रपटाच्या मुहूर्ताच्यावेळी चित्रपटातील सर्वजण एकत्र आले आणि एक झकास भट्टी जमून आल्याची पोचपावतीच मिळाली,” निर्माता स्वप्नील जोशी म्हणाला.

चित्रपटाची घोषणा ऑक्टोबरमध्ये नवरात्रीत झाली होती. त्यानंतर एक छोटे टायटल व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला होता. चित्रपट कसा आकाराला आला हे सांगताना मधुगंधा कुलकर्णी म्हणाली, “सहज म्हणून आम्ही शर्मिष्ठा, तेजस आणि स्वप्नील यांना या कथेच्या वाचनासाठी बोलावले. हसून हसून हैराण झाले ते. स्वप्नीलनी विचारले, ‘मी काय करू? गोष्ट बायकांची आहे तर मी साडी नेसून रोल करतो.’ परेश मोकाशी म्हणाले, ‘नाही. तू काहीच करायचे नाही. तुला यात रोल नाही.’ त्यावर स्वप्नील जोशी म्हणाले, ‘मी निर्मात्याचा रोल करतो.’

Back to top button