Silk Smitha : गरिबीने केला छळ, बोल्ड बिनधास्त 'सिल्क'चा रहस्यमयी मृत्यू | पुढारी

Silk Smitha : गरिबीने केला छळ, बोल्ड बिनधास्त 'सिल्क'चा रहस्यमयी मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : दाक्षिणात्य चित्रपट इंडस्ट्रीतील एकमेव अशी अभनेत्री जिचे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक तिकिट खिडकीवर तुटून पडायचे. या अभिनेत्रीचे नाव विजयलक्ष्मी वदलापति. विजयलक्ष्मी सिनेजगतात ‘सिल्क स्मिता’ नावानेही ओळखले जाते. (Silk Smitha ) आज २ डिसेंबर रोजी तिचा जन्मदिवस. (Silk Smitha ) तीन फिल्मफेअर चित्रपट जिंकणारा चित्रपट सदमा श्रीदेवी आणि कमल हसन यांच्या करिअरमध्ये मैलाचा दगड मानला जातो. ऐंशीच्या दशकात जेव्हा बालु महेंद्रा ‘सदमा’ सारखा चित्रपट बनवतात, तेव्हा या सुपरहिट चित्रपटाबरोबरचं श्रीदेवी आणि कमल हसन अधिक लोकप्रिय बनतात. परंतु, कमल हसन-श्रीदेवी यांच्या अभिनयाच्या वलयामध्ये सिल्क स्मिता टॉपला होती. १९८३ मध्ये जेव्हा ‘सदमा’ रिलीज झाला होता, तेव्हा सिल्क ४ वर्षांमध्ये २०० चित्रपट करून आपल्या करिअरच्या टॉपवर होती.

संबंधित बातम्या –

१९९० च्या सुरूवातीपासून सिल्क स्मिताची जादू चालली. बोल्ड स्मिता अशी तिची ओळख. सिल्कने अनेक बी ग्रेड चित्रपट आणि सॉफ्ट पोर्न चित्रपट केले. त्याकाळी रजनीकांत आणि कमल हासन यासारखे स्टारदेखील सिल्कची लोकप्रियता पाहून थक्क झाले होते.

रजनीकांत आणि मादक अदाकारा सिल्क स्मिताने अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. यामध्ये १९८३ मध्ये आलेला चित्रपट ‘जीत हमारी हुई,’ १९८३ मध्ये आलेला चित्रपट ‘थंगा मगन,’ पायमपुली’ आणि ‘सिवाप्पु सूर्या’ यांचा समावेश आहे. या चित्रपटांमधील त्यांचे डान्स मूव्ह्ज वादग्रस्त ठरले.

सिल्कचा बोल्डनेस पाहून चित्रपट आणि निर्मात्यांची लाईन लागली. एकापेक्षा एक हिट चित्रपट दिल्यानंतर सिल्कचा एक डान्स नंबर चित्रपटात असायला हवाच, हे सूत्रच ठरले.

गरिबीत गेलं बालपण

२ डिसेंबर, १९६० रोजी आंध्र प्रदेशातील एलुरूजवळील एका गावात सिल्क स्मिताचा जन्म झाला होता. बालपणापासून पाहिलेल्या गरिबीतून तिला मुक्त व्हायचं होतं. तिच्या आईने एका बैलगाडीवाल्यासोबत तिचे लग्न ठरवले. सिल्क आपल्या शहरामध्ये येणाऱ्या चित्रपटांचे पोस्टर पाहायची. एक दिवस सकाळी सिल्कने मद्रासला जाण्यासाठी रेल्वे पकडली आणि कॉलिवूड निर्मात्यांकडे गेली.

मोलकरीण ते मेकअप असिस्टंट

सिल्क एका अभिनेत्रीच्या घरात मोलकरीण म्हणून काम करत होती. त्यानंतर ती तिची मेकअप असिस्टंट बनली. एक दिवस एक चित्रपट निर्माता आपल्या चमचमत्या कारमधून त्या अभिनेत्रीच्या घरात आला. सिल्क त्या कारला पाहतच राहिली आणि एक दिवस अशाच कारमध्ये बसण्याचे स्वप्न पाहू लागली.

बिनधास्त सिल्क

दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर सिल्कने बी-टाउनमध्ये नशीब आजमावले. ‘सदमा’ या चित्रपटात तिने साकारलेली भूमिका आजदेखील लक्षात राहण्यासारखी आहे. सिल्कचे अनेक चित्रपट हिंदीमध्ये डब करण्यात आले आहेत.

रजनीकांत आणि स्मिताचे अफेअर?

असे म्हटले जाते की, रजनीकांत आणि सिल्क स्मिताचे अफेअर होते. रजनीकांत यांनी सिगारेटने सिल्कच्या शरीरावर डाग बनवले असल्याचा आरोप झाला होता. परंतु, याला कोणताही पुरावा नाही. १९७९ मध्ये रिलीज झालेला तमिळ चित्रपट ‘वंदीचक्रम’मध्ये सिल्कच्या भूमिकेने धुमाकूळ घातला. या भूमिकेमुळे तिला मोठा ब्रेक मिळाला.

१७ वर्षांचे करिअर

१७ वर्षांच्या मोठ्या करिअरमध्ये तिने ४५० हून अधिक तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले.

सॉफ्ट पोर्न भूमिका

तिला एकाच प्रकारच्या भूमिका मिळत गेल्या. त्याला ‘सॉफ्ट पोर्न’ असं म्हटले जाऊ लागले.

अन्‌ रहस्यमयी मृत्यू …

२३ सप्टेंबर, १९९६ रोजी विजयलक्ष्मी उर्फ सिल्क स्मिताचा मृतदेह आपल्या राहत्या घरात पंख्याला लटकलेला आढळला होता. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांना तिच्या मृत्यूबाबत कोणतेही ठोस पुरावे मिळाले नाही. फॉरेन्सिक तपासातही काही निष्पन्न झाले नाही. तेलुगुमध्ये एक नोट मिळाली होती. परंतु, त्यावरूनही काही समजले नाही. अखेर तिचा मृत्यू एक रहस्य बनून राहिले. अखेर केसची फाईल बंद करण्यात आली. काही लोक आजदेखील ही हत्या असल्याचे मानतात. २०११ मध्ये विद्या बालनने ‘डर्टी पिक्चर’ हा चित्रपट केला. हा चित्रपट सिल्क स्मि‍ताच्या आयुष्यावर आधारित होता.

Image

चंद्रिका रवी साकारणार सिल्क स्मिता

दरम्यान, मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्री चंद्रिका रवी ही सिल्क स्मिताची भूमिका साकारणार असून तिचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. SilkSmitha: The Untold Story असे चित्रपटाचे नाव असणार आहे. जयराम हे हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहेत. २०२४ मध्ये हा चित्रपट तेलुगू, तमिळ, हिंदू, मल्याळम आणि कन्नड भाषेत रिलीज करण्याचे नियोजित आहे.

Back to top button