54th IFFI : इफ्फीचा आज समारोप; आयुष्मान खुराना, इशा गुप्ता उपस्थित राहणार | पुढारी

54th IFFI : इफ्फीचा आज समारोप; आयुष्मान खुराना, इशा गुप्ता उपस्थित राहणार

पणजी; पुढारी वृत्तसेवा : देश-विदेशातील अनेक उत्तमोत्तम चित्रपट, निर्माते, दिग्दर्शक, समीक्षक, लेखक, तंत्रज्ञ आणि भारतीय सिनेमावर प्रचंड प्रेम करणारे सिनेरसिक यांच्या मांदियाळीने खुललेल्या आणि उत्तरोत्तर रंगत गेलेल्या 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी ) मंगळवारी 28 रोजी सायंकाळी 5 वाजता समारोप होणार आहे. ताळगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर समारोप सोहळाही दिमाखात साजरा केला जाणार आहे. (54th IFFI)

यावेळी राष्ट्रीय फिल्म अ‍ॅवॉर्ड व चार फिल्मफेअर विजेता, अभिनेता, गायक आणि टेलिव्हिजन होस्ट आयुष्मान खुराना, ‘जन्नत 2’, ‘राज’ यासारख्या चित्रपटांमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या अभिनेत्री इशा गुप्ता आणि ‘गँग ऑफ वासेपूर’ फेम अभिनेता पंकज त्रिपाठी, केंद्रीय सूचना व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन आदी उपस्थित असणार आहेत. (54th IFFI)

यावेळी आंतरराष्ट्रीय ज्युरी प्रतिष्ठित सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार विजेत्याची निवड जाहीर करतील. ज्यात सुवर्ण मयूर पुरस्कार आणि दिग्दर्शक आणि निर्मात्यासाठी प्रमाणपत्रांचा समावेश असेल.

सर्वोत्कृष्ट चित्रपटाव्यतिरिक्त, ज्युरी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (महिला) आणि विशेष ज्युरी पुरस्कार श्रेणींमधील विजेते देखील निवडतील.

‘आंतरराष्ट्रीय स्पर्धा’ विभागासाठी महत्त्वाच्या शैलीतील 15 प्रशंसापात्र चित्रपट निवडले जातात. यात प्रथितयश आणि युवा असे सर्वच दिग्दर्शकांचे नाविन्यपूर्ण आणि कलात्मक चित्रपट प्रतिनिधित्व करत असतात. त्यातून खालील आंतरराष्ट्रीय ज्युरी विजेत्याची निवड
करतात.

आंतरराष्ट्रीय ज्युरी खालीलप्रमाणे :

1. शेखर कपूर (चित्रपट दिग्दर्शक) – अध्यक्ष, ज्युरी समिती.
शेखर कपूर हे एक नावाजलेले चित्रपट दिग्दर्शक, अभिनेते , कथाकार आणि निर्माता आहेत. गोल्डन ग्लोब आणि ऑस्करसाठी नामांकनाव्यतिरिक्त पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, बाफ्टा पुरस्कार, राष्ट्रीय समीक्षा मंडळ पुरस्कार आणि तीन फिल्मफेअर पुरस्कार यासह अनेक पुरस्कारांचे ते मानकरी आहेत. कान्स इंटरनॅशनल ज्युरीचे (2010) माजी सदस्य आणि इफ्फी ज्युरी अध्यक्ष (2015) आहेत. त्यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे.

2) जोस लुईस अल्केन
जोस लुईस अल्केन यांनी बेले इपोक (अकादमी पुरस्कार, सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपट, 1993), टू मच (1995), ब्लास्ट फ्रॉम द पास्ट (1999), आणि द. स्किन आय लिव्ह इन (2011) अशा अनेक चित्रपटांसाठी काम केले असून,1970 च्या दशकात फ्लूरोसंट ट्यूबचा मुख्य प्रकाश म्हणून वापर करणारे ते पहिले सिनेमॅटोग्राफर आहेत. त्यांना अनेक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि 1989,1992,1993,2002,2007 या वर्षांमधील सर्वोत्कृष्ट छायाचित्रणासाठी पुरस्कार मिळाला आहे.

3) जेरोम पेलार्ड

जेरोम पेलार्ड यांनी शास्त्रीय संगीतकार, कलादिग्दर्शक आणि शास्त्रीय रेकॉर्ड लेबलचे सीएफओ म्हणून काम केले आहे. डॅनियल टॉस्कन डु प्लांटियर यांच्यासोबत त्यांनी सत्यजित रे, मेहदी चरेफ, सॉलेमाने सिसे, मॉरिस पियालाट आणि जीन-चार्ल्स टचेला यांच्या वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटांची सह-निर्मिती केलेली आहे. त्यांनी 1995 ते 2022 या कालावधीत कान फेस्टिव्हलसाठी काम केले आहे.

4) कॅथरीन दुसार्ट
15 देशांमधील जवळपास 100 चित्रपटांची निर्माती/ सह-निर्माती, कॅथरीन दुसार्ट या हौहौ शीजी लींघून के , द मिसिंग पिक्चर, आणि एक्झिल या चित्रपटांमुळे प्रसिद्ध आहेत. त्यांच्या निर्मितींपैकी, हैफा मधील अमोस गिताईच्या लैला या चित्रपटाने व्हेनिस 2020 स्पर्धेत सहभाग घेतला होता. रिथी पन्हाचा लेस इराडीएस (इरॅडिएटेड) हा बर्लिन 2020 मध्ये सर्वोत्कृष्ट माहितीपट ठरला होता.

5) हेलन लीक
ऑस्ट्रेलियाच्या प्रतिष्ठित सर्जनशील निर्मात्यांपैकी, हेलन लीक एक असून त्यांनी कर्निफेक्स ,स्वेरवे ,वूल्फ क्रीक , हेवन्स बर्निंग आणि ब्लॅक अँड व्हाइट या चित्रपटांसाठी वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केली आहे त्यांचे चित्रपट व्हेनिस, टोरंटो, लंडन आणि सिटगेस (कॅटलोनिया) सह तीसहून अधिक महोत्सवांमध्ये दाखवले गेले आहेत. चित्रपटातील महत्त्वपूर्ण सेवेबद्दल त्यांना ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलियाने सन्मानित करण्यात आले आहे.

हेही वाचा 

Back to top button