मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते ‘धर्मवीर २’ चित्रपटाचा मुहूर्त संपन्न | पुढारी

मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते 'धर्मवीर २' चित्रपटाचा मुहूर्त संपन्न

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘धर्मवीर… मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटातून स्वर्गीय आनंद दिघे यांचा जीवनप्रवास मांडण्यात आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला होता. “धर्मवीर” चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर काही महिन्यांपूर्वी ‘धर्मवीर २’ चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. नुकताच “धर्मवीर २” या चित्रपटाचा मुहूर्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे येथे करण्यात आला. याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक ,कलाकार, तंत्रज्ञ तसेच राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी आवर्जून उपस्थित होती. येत्या ९ डिसेंबरपासून ठाणे येथे चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.

संबंधित बातम्या –

मंगेश देसाई यांच्या साहील मोशन आर्ट्स या निर्मिती संस्थेद्वारे “धर्मवीर २” चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण विट्ठल तरडे साकारणार आहेत. अभिनेता प्रसाद ओक दिघे साहेबांची भूमिका साकारणार असून अन्य कलाकरांची नावे मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. एकंदरीतच “धर्मवीर” चित्रपटात कलाकारांची निवड, लेखन-दिग्दर्शन, अभिनय, संगीतासह सर्वच गोष्टी उत्तमप्रकारे जुळून आल्या होत्या. त्यामुळेच आता “धर्मवीर २”मध्येही त्याची पुनरावृत्ती होईल यात शंका नाही.

“धर्मवीर २” चित्रपटाच्या पोस्टरवर भगव्या बॅकग्राऊंडवर’ धर्मवीर २’ आणि “साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट….” अशी टॅगलाईन नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे हा चित्रपट धडाकेबाज पद्धतीने आणि रंजक कथानकाद्वारे हिंदुत्त्वावर भाष्य करणारा असल्याचा प्राथमिक अंदाज बांधता येत आहे. चित्रपटात कलाकार कोण असणार? हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र “धर्मवीर २” या चित्रपटातून साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट चित्रपटातून उलगडली जाणार म्हणजे काय,? हे समजून घेण्यासाठी अजुन थोडी वाट पहावी लागणार असल्याचे निर्माते मंगेश देसाई यांनी सांगितले.

Back to top button