

पुढारी ऑनलाईन डेस्क : गोव्यातील प्रतिष्ठित 54व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियाच्या (इफ्फी) उद्घाटन सोहळ्यात, पंकज त्रिपाठीच्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. (IFFI) 'कडक सिंग' असे चित्रपटाचे नाव असून वर्ल्ड प्रीमियर 'गाला प्रीमियर्स' या प्रवर्गात होणार आहे. हा चित्रपट ८ डिसेंबर २०२३ रोजी ZEE5वर प्रदर्शित होणार आहे. (IFFI)
संबंधित बातम्या –
राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक अनिरुद्ध रॉय चौधरी यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. यामध्ये पंकज त्रिपाठी, पार्वती थिरुवोथु तसेच बांगलादेशी कलाकार जया अहसान, संजना सांघी, दिलिप शंकर, परेश पाहुजा, वरुन बुद्धदेव प्रमुख भूमिकांमध्ये आहेत.
या चित्रपटात ए. के. श्रीवास्तव उर्फ कडक सिंग यांच्या आयुष्याची कहाणी दाखवली आहे. अभिनेते पंकज त्रिपाठी म्हणाले, "कडक सिंगसारखी व्यक्तिरेखा मी ह्यापूर्वी कधीच केलेली नाही. ही एक वेगळीच व्यक्तिरेखा आहे आणि अशी बहुपदरी व्यक्तिरेखा निभावणे खूपच आनंददायी होते. शिवाय मला टोनी दा, पार्वती, जया आणि संजनासारखी तरुण व उत्साही अभिनेत्री अशा अविश्वसनीय प्रतिभावंतांसह काम करण्याची संधी मिळाली."
अभिनेत्री पार्वती म्हणाल्या, "चित्रपट करण्याच्या प्रत्येक अंगाचा अनुभव 10 पैकी 10 असा अव्वल ठरणे तसे दुर्मीळच आहे. हा दुर्मीळ अनुभव मला 'कडक सिंग'ने मिळवून दिला."
अभिनेत्री संजना सांघी म्हणाली, "रितेश शहा ह्यांनी अगदी पहिल्यांदा 'कडक सिंग'ची कथा सांगितल्यापासून आपण काहीतरी खास करणार आहोत अशी जाणीव मला आतून होत होती. साक्षी ही अनेक पदर असलेली आणि जटील व्यक्तिरेखा आहे."
अभिनेत्री जया म्हणाली, "या चित्रपटात मी साकारलेली व्यक्तिरेखा म्हणजे माझ्यासाठी अगदी नवीन, ताजातवाना व नक्कीच समृद्ध करणारा अनुभव होता. एक दिग्दर्शक म्हणून अनिरुद्ध रॉय चौधरींसोबत काम करण्याची इच्छा मला नेहमीच होती. शंतनू मोइत्रा यांचे संगीत खूपच सुंदर आहे. अविक मुखोपाध्याय यांच्या सेटवरील प्रकाशयोजनेमुळे सर्व काही अत्यंत सुंदर आणि वास्तवही भासते."