नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : हिरालाल समरिया यांची मुख्य माहिती आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आज (6 नोव्हेंबर) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हिरालाल समरिया यांना राष्ट्रपती भवनात आयुक्त पदाची शपथ दिली. मूळ राजस्थानचे असलेले हिरालाल समरिया हे केंद्रीय माहिती आयोग प्रमुख पदी विराजमान होणारे देशातील पहिले दलित ठरले आहेत.
सरन्यायधीश डी. वाय. चंद्रचूड, न्या. जे बी पार्डीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने 30 ऑक्टोबर रोजी केंद्र आणि राज्य सरकारांना केंद्रीय माहिती आयोग आणि राज्य माहिती आयोगाधील रिक्त पदे भरण्याचे निर्देश दिले होते, अन्यथा माहिती अधिकार कायदाच मरण पावेल अशी कडक टिप्पणी यावेळी सर्वेच्च न्यायालयाने केली होती. त्यानंतर माहिती आयुक्त हिरालाल समरिया यांची आज मुख्य माहिती आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली.
केंद्रीय माहिती आयोगाचे अध्यक्ष मुख्य माहिती आयुक्त असतात आणि त्यात जास्तीत जास्त 10 माहिती आयुक्त असू शकतात. समरिया यांची मुख्य माहिती आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर माहिती आयुक्तांची अजून आठ पदे रिक्त आहेत. हिरालाल समरिया यांच्या नियुक्तीनंतर आनंदी रामलिंगम आणि व्हीके तिवारी या दोन जणांना देखील माहिती आयुक्त बनवण्यात येणार आहे.