

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'मिशन राणीगंज- द ग्रेट भारत रेस्क्यू' चित्रपटाच्या माध्यमातून दमदार कमबॅक करायला अक्षय कुमार (Mission Raniganj Trailer) तयार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर सोमवारी रिलीज झाला आहे. सोशल मीडियावर ट्रेलर पोस्ट करताना अक्षय कुमारने लिहिले आहे की, "सरदार जसवंत सिंह गिल जी, हा ट्रेलर तुमच्या स्मृतीत तुमच्या शौर्याला समर्पित आहे. तुमच्या स्मरणार्थ तुमच्या संघर्षाला सलाम." (Mission Raniganj Trailer)
ट्रेलर दमदार असून अक्षय या चित्रपटाद्वारे जोरदार पुनरागमन करण्यास सज्ज आहे. चित्रपटाच्या कथेची एक झलक ट्रेलरमध्ये दाखवण्यात आली आहे. सत्य घटनेवर आधारित या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सरदार जसवंत सिंग यांनी काही मजुरांचे प्राण वाचवण्यासाठी आपला जीव कशाप्रकारे धोक्यात घातला होता, याचे चित्रण आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये परिणीती चोप्राची लहान झलक पाहायला मिळत आहे.
ट्रेलर रिलीज झाल्यानंतर एका युजरने लिहिले की. "ही हृदयाला स्पर्श करणारी अतिशय सकारात्मक कथा होती. सरदार जसवंत सिंह गिल यांचे शौर्य आणि समर्पण खरोखरच आश्चर्यकारक होते." आणखी एका चाहत्याने लिहिले – एअरलिफ्ट व्हाईब्स आले आहेत.