डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट उलगडणार ‘जय भीम’

जय भीम
जय भीम

पुढारी ऑनलाईन डेस्क : समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणणारे, राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट पाहण्याची पर्वणी प्रेक्षकांना नव्याने मिळणार आहे. झी मराठी वाहिनीवर सुरू होत असलेल्या "जय भीम… एका महानायकाची गाथा" या मालिकेतून डॉ. आंबेडकर यांचे कार्य उलगडणार आहे. २५ सप्टेंबरपासून ह्या मालिकेची सुरूवात होत आहे. महानायकाच्या आयुष्यातील संघर्षापासून ते त्यांनी समाजाच्या परिवर्तनासाठी दिलेल्या योगदानाचा आलेख यामध्ये पाहता येणार आहे.

जय भीम … एका महानायकाची गाथा ही मालिका २५ सप्टेंबरपासून झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. डॉ. भीमराव रामजी आंबेडकर म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजासाठी मोलाचे कार्य केले आहे. आजपर्यंत डॉ. आंबेडकर यांचे कार्य विविध भाषांमधून मालिका, माहितीपटाच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर दाखवण्यात आले आहे.

महानायक डॉ. आंबेडकर यांच्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावरील प्रसंग, घटना दाखवणारी ही मालिका उत्सुकतेचा विषय बनली आहे. डॉ. आंबेडकर यांच्या बालपणापासून ते त्यांच्या विद्यार्थीदशेतील घटनांचा वेध घेण्याबरोबरच स्वातंत्र्यसंग्रामातील डॉ. आंबेडकर यांची भूमिका हा या मालिकेचा गाभा आहे. स्वतंत्र भारताला संविधानाचा पाया देण्यासाठी डॉ. आंबेडकर यांनी केलेला अभ्यास, दलित समाजाच्या उद्धारासाठी घेतलेले कष्ट यावर ही मालिका आधारीत आहे.

डॉ. आंबेडकर यांच्या सामाजिक कार्याबरोबरच डॉ. आंबेडकर हे व्यक्ती म्हणून कसे होते, त्यांचे कौटुंबिक आयुष्य कसे होते, यावरही या मालिकेत प्रकाश टाकण्यात आला आहे. झी मराठी वाहिनीवर या मालिकेचा प्रोमो सध्या लक्ष वेधून घेत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news