प्रभासने प्रशांत नीलच्या 'सलार'चे चित्रीकरण आता पूर्ण केले आहे आणि यानंतर तो मोठा ब्रेक घेईल, असे संकेत आहेत. आता हा मोठा ब्रेक अन्य कोणत्याही कारणासाठी नसून तो गुडघ्याच्या शस्त्रक्रियेसाठी आहे.
प्रभासला गुडघ्याची दुखापत झाली असून यावर शस्त्रक्रिया करवून घेणे भाग असल्याचे त्याला डॉक्टरांनी यापूर्वीच सांगितले होते. मात्र, हातातील प्रोजेक्ट पूर्ण करण्याच्या उद्देशाने त्याने आतापर्यंत हा निर्णय घेतला नव्हता. आता त्याने 'सलार'चे चित्रीकरण पूर्ण केल्यानंतर आपल्या तब्येतीकडे लक्ष देणे हा प्राधान्यक्रम असेल, असे म्हटले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे प्रभासला 'बाहुबली' चित्रपटाच्या चित्रीकरणावेळीच ही दुखापत झाली होती; पण तरीही त्याने विविध कारणांमुळे शस्त्रक्रिया शक्य होईल तितकी लांबणीवर टाकली होती. दुखापतीमुळे बेचैनी असली तरी त्याला बिझी शेड्यूलमधून वेळ काढणे दुरापास्त होत होते. आता मात्र त्याने आपण मोठा ब्रेक असल्याचे रीतसर जाहीर केले आहे.
'सलार' चित्रपटात बरेच अॅक्शन सीन होते आणि ते करताना प्रभासला गुडघ्याच्या आणखी असह्य वेदना जाणवल्या. आता त्याला याकडे लक्ष देणे भागच असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. पूर्वनियोजित रूपरेषेप्रमाणे 'आदिपुरुष' प्रदर्शित झाल्यानंतर लगेच प्रभासवर शस्त्रक्रिया केली जाणार होती; पण त्याच दरम्यान अमेरिकेत एका कौटुंबिक सोहळ्याला जाणे भाग असल्याने प्रभासला तो मुहूर्तही साधता आला नव्हता. प्रभासच्या गुडघ्यावरील शस्त्रक्रिया यापूर्वी अमेरिकेत होणार होती; पण आता ती हैदराबादमध्येच केली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.