पुढारी ऑनलाइन डेस्क: Rajni Kant's Japanese Fan : दाक्षिणात्य चित्रपटांचे स्टार रजनिकांत यांचा जेलर हा चित्रपट 10 ऑगस्टला प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. रजनिकांतच्या लोकप्रियतेमुळे सर्व शो अॅडवान्स तिकिट बुक झाले होते. दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचा चाहतावर्ग फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगात आहे. जेलर चित्रपट पाहण्यासाठी एका जपानी जोडप्याने जपानवरून थेट चेन्नई गाठले आहे.
रजनीकांत यांचा नवीन चित्रपट 'जेलर' पाहण्यासाठी एक जपानी जोडपे ओसाका ते चेन्नई, तामिळनाडू येथे आले आहे. पीटीआयने त्यांचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, "जेलर चित्रपट पाहण्यासाठी, आम्ही जपानहून चेन्नईला आलो आहोत," असे जपानच्या रजनीकांत फॅन क्लबचे नेते यासुदा हिदेतोशी यांनी म्हटले आहे. त्यांच्या हातात रजनीकांतचे पोस्टर दिसत आहे.
झी बिझनेस हिंदीने दिलेल्या माहितीनुसार, स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या सुपरस्टार रजनीकांतच्या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. विशेषत: सुपरस्टार रजनीकांत यांच्या चित्रपटाच्या क्रेझमुळे साऊथमध्ये चित्रपटाचे शो हाऊसफुल्ल होत आहेत. बॉक्स ऑफिसच्या कमाईतही त्याची झलक स्पष्टपणे पाहायला मिळते. यापूर्वी चित्रपटाच्या बंपर तिकिटांचे आगाऊ बुकिंग केले जात होते. त्याचबरोबर चित्रपटाच्या प्रदर्शनानिमित्त अनेक कार्यालयांना सुटी देण्यात आली होती.
ट्रेड अॅनालिस्ट सुमित कडेल यांच्या मते, जेलरला बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक ओपनिंग मिळाली आहे. सुरुवातीच्या अंदाजानुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी 40 कोटी ते 42 कोटींची कमाई केली आहे. त्याचवेळी 48 कोटी ते 50 कोटी रुपयांची कमाई झाली आहे. ट्रेड अॅनालिस्टच्या मते, थलैवा रजनीकांतच्या स्टारडमची पूर्ण झलक आज पाहायला मिळत आहे. चित्रपटात रजनीकांतशिवाय रम्या कृष्णन आणि तमन्ना भाटिया यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.