Dev Raturi : उत्तराखंडच्या देव रातुरीची चीनमध्ये धूम! फिल्म इंडस्ट्रीत बनला सुपरस्टार | पुढारी

Dev Raturi : उत्तराखंडच्या देव रातुरीची चीनमध्ये धूम! फिल्म इंडस्ट्रीत बनला सुपरस्टार

पुढारी ऑनलाईन डेस्क : ४६ वर्षाच्या देव रातुरीची (Dev Raturi) चीनमध्ये मोठी चर्चा आहे. उत्तराखंडमधील टिहरी गढवाल जिल्ह्यातील केमरिया सौर या गावातील देव चीनमध्ये कसा पोहोचला आणि चीनमधील शाळांतील पाठ्यपुस्तकामध्ये त्याचे नाव कसे पोहोचले? चिनी चित्रपटसृष्टीत मोठे स्थान कसे मिळवे, ही खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे. (Dev Raturi)

चीनच्या पाठ्यपुस्तकात उल्लेख

देव हा ब्रुस ली चा डायहार्ट फॅन आहे. त्याला ब्रुस लीच्या पावलावर पाऊल ठेवायचे होते. १९९८ मध्ये मुंबईत अभिनेता पुनीत इस्सार यांच्यासमोर त्याने ऑडिशन दिले होते. परंतु, तो अयशस्वी ठरला. परंतु, भाग्य कुठे गेऊन जाईल, याची कल्पना त्याला नव्हती. तो एके दिवशी चिनी चित्रपटसृष्टीत ठसा उमटवणार आणि इतके यश, प्रसिद्धी मिळवेल, याची कल्पनासुद्धा त्याला नसावी. तो चीनी इंडस्ट्रीमध्ये इतका प्रसिद्ध झाला की, शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये त्याच्या नावाचा उल्लेख आहे. काही अभ्यासक्रमांमध्ये त्याच्या प्रेरणादायी कथा म्हणून समावेश आहे.

तो चीनमधील एका रेस्टॉरंटमध्ये वेटर म्हणून काम करू लागला. १८ वर्षानंतर त्याला चीनमध्ये एक रेस्टॉरंट उघडण्याची संधी मिळाली. तेथून सुरु झाली त्याची अमोल कहाणी. देवचा जन्म शेतकरी कुटुंबातील आहे. त्याने कराटेचेदेखील प्रशिक्षण घेतले आहे. पुढील प्रशिक्षणासाठी चीनला जाण्याची संधी तो शोधत होता. २००५ मध्ये चीनमधील शेनझेन येथील एका भारतीय रेस्टॉरंटमध्ये त्याला वेटरची नोकरी मिळाली. पण त्यापूर्वी देवने दिल्लीत राहून अनेक छोट्या-मोठ्या नोकऱ्या केल्या.

वेटरपासून सुरुवात

चीनमध्ये गेल्यानंतर तेथील लोकांनी त्याला सांगितले की, कराटेच्या पुढील शिक्षणासाठी त्याला शाओलिन टेम्पल येथे जावे लागेल. पण ते त्याला परवडणारे नव्हते. प्रशिक्षण घेण्याचे त्याचे स्वप्न रात्री त्याला झोपू देत नसत. त्यावेळी तो वेटर म्हणून काम करत असे. पगार होता फक्त महिना दहा हजार! त्याकाळात देवने मंदारिन भाषेवर प्रभुत्व मिळवलं.

आठ रेस्टॉरंट्सचा मालक

तो पुढे म्हणाला, “माझ्याकडे धीर धरण्याशिवाय पर्याय नव्हता. मी पुढील सात वर्षे कठोर परिश्रम केले आणि एका मोठ्या रेस्टॉरंटमध्ये व्यवस्थापकाच्या पदापर्यंत पोहोचलो. २०१३ मध्ये, मी शिआनमध्ये माझे स्वतःचे रेड फोर्ट रेस्टॉरंट उघडले. ते भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशावर आधारित आहे.” देवचे आज चीनमध्ये रेड फोटोर्ट, अंबर असे आठ रेस्टॉरंट्स आहेत.

देव रातुरी कुटुंबासोबत

चिनी चित्रपट इंडस्ट्रीत स्टार

देवचं भाग्यचं म्हणायचे की, २०१७ मध्ये एके दिवशी त्याच्या घरी चिनी दिग्दर्शक जेवायला आले. तेथे देवची भेट झाली. त्याला SWAT नावाच्या टीव्ही मालिकेत छोट्या भूमिकेची ऑफर आली. त्याने हे काम स्वीकारले. तेव्हापासून, त्याने ३५ हून अधिक चीनी चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे, ज्यात ‘माय रूममेट इज अ डिटेक्टिव्ह’ सारख्या लोकप्रिय चित्रपटांचा समावेश आहे. त्याने लियू ताओ, वू गँग, झांग जिन, ली झिटिंग आणि किओ झेंयू यांसारख्या लोकप्रिय चिनी कलाकारांसोबत काम केले आहे.

देव शिआन येथे पत्नी अंजली आणि दोन मुले आरव (वय ११) आणि अर्णव (वय ९) सह राहतो. पण उत्तराखंडशी असलेले नाते त्याने तोडलेले नाही. त्याने त्यांच्या गावातील जवळपास १५० बेरोजगारांना चीनमध्ये आणले आहे, त्यांना नोकऱ्या आणि संधी दिल्या आहेत. त्याच्या दिल्ली येथील एक जवळचे मित्र मनोज रावत म्हणाले, “त्यांच्या एकूण ७० कर्मचार्‍यांपैकी सुमारे ४० उत्तराखंडचे आहेत आणि उर्वरित चिनी आहेत.”

Back to top button