सुपरस्टार रजनीकांत : ‘शून्य ते शिखर’ प्रवासाचा गौरव | पुढारी

सुपरस्टार रजनीकांत : ‘शून्य ते शिखर’ प्रवासाचा गौरव

चंद्रकांत यादव

स्वप्नांना परिश्रमांचे पंख दिले की, भरारी घेता येते, याचा धडा म्हणजे शिवाजीराव गायकवाड हे मराठमोळे व्यक्‍तिमत्त्व! बस कंडक्टर शिवाजी ते सुपरस्टार रजीनकांत हा या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रवास थक्‍क करणारा आहे. ‘सीबीएसई’च्या अभ्यासक्रमात या अभिनेत्याच्या जीवनप्रवासावर धडाही आहे, ‘बस कंडक्टर से लेकर सुपरस्टार तक,’ असे या धड्याचे नाव! अभ्यासक्रमातील धड्याचा हा मान लाभलेले एकमेव अभिनेते म्हणजे सुपरस्टार रजीनकांत! वयाची सत्तरी ओलांडली तरीही ते ‘हीरो’ आहेत, हे विशेष!! चित्रपटसृष्‍टीतील याेगदानाबद्‍दल अभिनेते रजनीकांत यांना आज दिल्‍लीमध्‍ये दादासाहेब फाळके पुरस्‍काराने गाौरविण्‍यात येणार आहे.

एकेकाळी कंडक्टर म्हणून तिकिटांचे रुपया-दोन रुपये जमा करणारे शिवाजीराव 2007 मध्ये एका चित्रपटासाठी 26 कोटी रुपये शुल्क आकारू लागले होते. आशिया खंडात जॅकी चॅनपाठोपाठ सर्वाधिक रक्‍कम घेणार्‍या या अभिनेत्याच्या जीवनप्रवासात यशापयशाचे वा आर्थिक चढउतार असे आलेच नाहीत. सतत कमान चढती राहिली.

कंडक्टर म्हणून प्रवाशांना तिकिटे देण्याची त्यांची आगळी शैली त्यांना चंदेरी दुनियेत घेऊन आली. अर्थात, मद्रास फिल्म इन्स्टिट्यूटमधून पदविकाही त्यांनी घेतली. ‘अपूर्वा रागंगाल’ (1975) या तमिळ चित्रपटातून रजनीकांत यांची कारकीर्द सुरू झाली. आता ‘अन्‍नाथे’ हा त्यांचा अत्यंत महत्त्वाकांक्षी चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे.

गेली पन्‍नास वर्षे सतत नायक म्हणून चित्रपटांत येत राहणारे रजनीकांत चित्रपटसृष्टीत एकमेव असावेत. ‘कबाली’ ‘रोबोट’ ‘-2.0’ असे डझनोगणती सुपरडुपर हिट चित्रपट रजनीकांत यांच्या नावावर आहेत. हिंदी चित्रपटांतही त्यांना रसिकांचा भरभरून प्रतिसाद लाभला. ‘अंधा कानून’मधील त्यांची भूमिका विशेष गाजली होती.

‘गंगवा’सारखे अनेक हिंदी हिट चित्रपटही त्यांनी दिले. संवादफेकीची सुपरस्टार रजीनकांत यांची आगळी शैली भारतातच नव्हे तर परदेशातही लोकप्रिय आहे.

रजनीकांत यांच्याबद्दल…

* रजनीकांत यांचा जन्म 12 डिसेंबर 1950 रोजी एका मराठी कुटुंबात झाला. आई रमाबाई, वडील रामोजी राव. रामोजी हे बंगळुरू पोलिसांत कॉन्स्टेबल होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुयायी. यातूनच मुलाचे नामकरण त्यांनी शिवाजी राव असे केले.

* पुणे जिल्ह्यातील जेजुरी जवळील मावडी कडे पथ्थर हे त्यांचे मूळ गाव. चार भावंडांत रजनीकांत सर्वांत धाकटे. शालेय जीवनातच त्यांनी नाटकांतून अभिनय सुरू केला होता. पुढे बंगळुरू ट्रान्स्पोर्ट सर्व्हिसमध्ये त्यांनी कंडक्टर म्हणून नोकरी केली. लता रंगचारी या पत्रकार युवतीशी 26 फेब्रुवारी 1981 मध्ये ते विवाहबद्ध झाले. सौंदर्या आणि ऐश्‍वर्या या दोन मुली त्यांना आहेत.

Back to top button