

पुढारी ऑनलाइन डेस्क : Mangal Dhillon : पंजाबी आणि हिंदी चित्रपट तसेच मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक मंगल ढिल्लों यांचे निधन झाले आहे. ते दीर्घ काळापासून कँसरशी लढा देत होते. काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने लुधियाना येथील एका रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. आज रविवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
टिव्ही आणि चित्रपट अभिनेते यांच्या निधनाच्या वृत्तानंतर चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. मंगल ढिल्लों यांनी आपल्या अभिनयाने अनेकांच्या हृदयावर राज्य केले होते. पंजाबी चित्रपट इंड्स्ट्री गाजवल्यानंतर बॉलीवूड चित्रपटात देखील त्यांनी स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. खून भरी मांग या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेने बॉलीवूडमध्ये त्यांना चांगले स्थान मिळाले.
या चित्रपटांमध्ये मंगल ढिल्लों यांनी केले काम
मंगल ढिल्लों हे केवळ बॉलिवूड आणि टीव्ही जगतातच नाही तर पंजाबी चित्रपटांमध्येही मोठे नाव होते. त्यांनी अनेक पंजाबी चित्रपटांमध्ये काम करून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. मंगल ढिल्लों रेखा स्टारर 'खून भरी मांग'मध्ये वकिलाच्या भूमिकेत दिसले होते. याशिवाय त्यांनी 'दयावान', 'जख्मी औरत', 'प्यार का देवता', 'विश्वात्मा' आणि 'दलाल' या चित्रपटांसह अनेक अविस्मरणीय चित्रपट केले. यामध्ये ते कधी वकील, कधी पोलीस निरीक्षक तर काहींमध्ये डाकू आणि सर्पमित्र म्हणून ही काम केले.
'बुनियाद' सारख्या शोमधून टीव्हीवर ओळख
मंगल ढिल्लों यांनी टेलिव्हिजन मालिकांमध्येही खूप नाव कमावले हाेते. दूरदर्शनवरील सुरुवातीच्या काळातील गाजलेल्या मालिकांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाने वेगळा ठसा उमटवला. 'बुनियाद', 'कथा सागर', 'जुनून', 'मुजरिम हाजीर', 'मौलाना आझाद', 'परमवीर चक्र', 'युग' आणि 'नूरजहाँ' यांसारख्या मालिकांसाठी ते आजही स्मरणात राहतील, असे काम त्यांनी केले हाेते.
हे ही वाचा :