तन्वीर अख्तरने यश बनून फसवलं, आता धर्मांतरासाठी...मॉडेलचे गंभीर आरोप | पुढारी

तन्वीर अख्तरने यश बनून फसवलं, आता धर्मांतरासाठी...मॉडेलचे गंभीर आरोप

रांची/मुंबई : वृत्तसंस्था – रांची येथील मॉडेलिंग स्कूलचा संचालक तन्वीर अख्तर याने त्याची ओळख यश नावाने दिली. मैत्री झाल्यानंतर माझे लैंगिक शोषण केले आणि पुढे माझ्याशी निकाह करायचा तर हिंदू धर्म सोडून इस्लाम कबूल कर, ही अट घालून धमकावू लागला, अशी तक्रार बिहारच्या भागलपूरची मूळ रहिवासी तसेच मॉडेल मानवी राज सिंह हिने दिल्यावरून मुंबई पोलिसांत तन्वीर अख्तरविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मानवी ही याआधी रांचीतील मॉडेलिंग स्कूलमध्ये काम करत होती. तिने मुंबईतील वर्सोवा पोलिस ठाण्यात तन्वीरविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. मानवीच्या तक्रारीनुसार तन्वीर अख्तर तिच्या मागोमाग मुंबईतही आला होता. तन्वीरने तिला मारहाण केली आणि धर्मांतर व निकाह न केल्यास ठार मारण्याची धमकी दिली.

मानवी हिने एक व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड केला असून, त्यात मी मरेन, पण माझा धर्म बदलणार नाही, असे स्पष्ट केले आहे.

माफ केल्याचाही घेतला गैरफायदा

तन्वीर याने माझ्या छायाचित्रांचा गैरवापर केला. मी त्याच्याविरोधात याआधीही तक्रार केली होती. भविष्यात असे करणार नाही, हे त्याने कोर्टात प्रतिज्ञापत्रावर लिहून दिले होते. त्यामुळे मी त्याच्याविरुद्धची तक्रार मागे घेतली, आता तो याचा गैरफायदा घेत आहे. तन्वीरने हे फक्त माझ्यासोबत नव्हे, तर अन्य मुलींसोबतही केलेले आहे.

ही कलमे, लव्ह जिहादची पडताळणी

तन्वीर अख्तरविरुद्ध कलम 376, 376 (2), 376 (एन), 328, 506, 504, 323 आणि आयटी कायद्याच्या कलम 67 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई पोलिसांनी पुढे तो रांची पोलिसांकडे वर्ग केला असून, हा लव्ह जिहादचा गुन्हा आहे काय, हेही पोलिस पडताळून पाहात आहेत.

Back to top button