Ranveer Singh | 'गली बॉय' रणवीर सिंहची हॉलिवूडमध्ये एन्ट्री?, 'या' टॅलेंट 'एजन्सी'सोबत केली हातमिळवणी | पुढारी

Ranveer Singh | 'गली बॉय' रणवीर सिंहची हॉलिवूडमध्ये एन्ट्री?, 'या' टॅलेंट 'एजन्सी'सोबत केली हातमिळवणी

पुढारी ऑनलाईन : बॉलिवूडमधील अनेक अभिनेते, अभिनेत्री आणि दिग्दर्शक आता हॉलिवूडमध्ये (Hollywood) एन्ट्री करण्याच्या तयारीत आहेत. नुकताच बॉलिवूडचा अष्टपैलू अभिनेता रणवीर सिंहने (Bollywood actor Ranveer Singh) विलियम मॉरिस एंडेव्हर (WME) नावाच्या आंतरराष्ट्रीय टॅलेंट एजन्सीसोबत करार केला आहे. याबाबतचे वृत्त India Today ने दिले आहे.

WME ही एजन्सी गल गदोत, एम्मा स्टोन, ओप्रा आणि चार्लीझ थेरॉन यांसारख्या आंतरराष्ट्रीय स्टार्सना रिप्रेझेंट्स करते. या एजन्सीने २०२१ मध्ये बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिला साइन केले होते. आता रणवीरने जागतिक प्रतिनिधित्वासाठी WME सोबत साइन केले आहे.
WME सोबत करार करण्यापूर्वी रणवीर सर्कस (Cirkus) आणि जयेशभाई जोरदार (Jayeshbhai Jordaar) या चित्रपटांमध्ये दिसला होता. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले. जगभरातील बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या बाबतीत सर्कसने केवळ ६०.६ कोटींची कमाई केली, तर जयेशभाई जोरदारची कमाई केवळ १७.५ कोटी रुपयांपर्यंत मर्यादित राहिली.

या वर्षी जुलैमध्ये चित्रपटगृहात रिलीज होणाऱ्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये (Rocky Aur Rani Kii Prem Kahani) तो आलिया भट्ट सोबत दिसणार आहे. रणवीर आणि आलियाने झोया अख्तर दिग्दर्शित गली बॉय मध्ये एकत्र काम केले होते. त्यानंतर दुसऱ्यांदा ते एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत.

WME ही एजन्सी वंडर वूमन अभिनेत्री गल गदोत (Gal Gadot), टॉक शो होस्ट ओपरा विन्फ्रे, Cruella मधील अभिनेत्री Emma Stone आणि Mad Max: Fury Road मधील अभिनेता चार्लीझ थेरॉन यासारख्या दिग्गज सेलिब्रिटींसोबत काम करते. तसेच या एजन्सीने स्लमडॉग मिलेनियर मधील अभिनेत्री फ्रीडा पिंटो (Freida Pinto) हिच्यासाठी काम केले होते.

रणवीर सिंहने २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. तेव्हापासून आत्तापर्यंत त्याने ‘सिम्बा’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘पद्मावती’ असे अनेक हिट चित्रपट केले आहेत. २०२० मध्ये गली बॉय हा चित्रपट भारताकडून ऑस्करसाठी पाठवण्यात आला होता. या चित्रपटातील त्यांचे ‘अपना टाइम आएगा’ हे रॅप गाणे खूप लोकप्रिय झाले होते.

रणवीर हा बॉलिवूडमधील सर्वाधिक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहे. भारताबरोबरच परदेशातही त्यांचा चांगला चाहतावर्ग आहे. एका अहवालानुसार, रणवीर २०२२ मधील भारतातील सर्वात मौल्यवान सेलिब्रिटी असून त्याचे ब्रँड मूल्य १८१.७ दशलक्ष डॉलर आहे. रणवीरला अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांचा ब्रँड ॲम्बेसीडर म्हणूनही नियुक्त करण्यात आले आहे. (Bollywood actor Ranveer Singh)

हे ही वाचा :

Back to top button