The Kerala Story : दिग्दर्शक केदार शिंदेचं ‘द केरला स्टोरी’वर ट्विट, “या नेत्यांना…”

The Kerala Story : दिग्दर्शक केदार शिंदेचं ‘द केरला स्टोरी’वर ट्विट, “या नेत्यांना…”

'पुढारी ऑनलाईन डेस्क : मागील काही दिवस वादाच्‍या भाेवर्‍यात सापडलेला 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट चर्चेत आहे. प्रदर्शनानंतर या उत्‍स्‍फूर्त प्रतिसादही मिळत आहे.  या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी काही संघटना, राजकीय नेते यांच्याकडून होऊ लागली आहे. आता 'महाराष्ट्र शाहीर' चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनीही  या चित्रपटावरुन महाराष्ट्रातील नेत्यांवर निशाणा साधला आहे. याबाबत त्यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटची चर्चा मनोरंजनविश्वासह सोशल मीडियावर होवू लागली आहे. (The Kerala Story)

The Kerala Story : या नेत्यांना ठाऊक असेल का?

शाहीर साबळे यांचे नातू आणि  'महाराष्ट्र शाहीर' चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी ट्विट करत  'द केरळ स्टोरी' चित्रपटाचे शो मोफत दाखवण्याच्या भूमिकेवर टीका केली आहे. याबबत त्यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, "दुर्दैव… महाराष्ट्रात "केरला स्टोरी" या सिनेमाचे खास शो आपले महाराष्ट्रातले नेते प्रायोजित करून लोकांना मोफत दाखवतायत. या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने "महाराष्ट्र शाहीर" प्रदर्शित झालाय. हे या नेत्यांना ठाऊक असेल का? शाहीर साबळे कोण? हे तरी माहिती असेल का?".

सुदीप्तो सेन दिग्दर्शित 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला. राजकीय संघटनांकडून या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी होत होती. चित्रपटाची कथा चार महिलांची आहे ज्यांना धर्मांतर करून ISIS या दहशतवादी संघटनामध्ये सामील केले जाते.

शाहीर साबळे यांचा जीवनपट उलगडवणारा 'महाराष्ट्र शाहीर' 

'महाराष्ट्र शाहीर' चित्रपट ख्यातनाम शाहीर साबळे यांचा जीवनपट दाखवला आहे. हा चित्रपट महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत २८ एप्रिल रोजी राज्यभरात प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. चित्रपटातील गाण्यांनी प्रेक्षकांनी दाद दिली आहे.

'द केरल स्टोरी' महाराष्ट्रात टॅक्स फ्री करावा : चित्रा वाघ

भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांनीही 'द केरल स्टोरी' महाराष्ट्रात टॅक्स फ्री करावा म्हणतं ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांना टॅग केलं आहे. ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, " या चित्रपटातून लव्ह जिहाद धर्मांतरण आणि दहशतवादाचा भयानक चेहरा समोर आला आहे. जनतेत विशेष म्हणजे तरुणाईमध्ये मोठ्या प्रमाणावर जागरूकता निर्माण व्हावी यासाठी भाजपा महिला मोर्चाच्या वतीने मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांना विनंती करते की 'द केरल स्टोरी' हा चित्रपट आपल्या महाराष्ट्रात टॅक्स फ्री करावा.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news