मुंबई; पुढारी ऑनलाईन : मुंबई क्राईम ब्रँचने बॉलीवूड अभिनेत्री क्रिसन परेरा हिला ड्रग्ज तस्करी प्रकरणात गोवणाऱ्या व फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. सध्या ही अभिनेत्री यूएईच्या शारजाह तुरुंगात कैदेत आहे. मुंबईतून अटक केलेल्या दोघांवर क्रिसन परेरा हिला ड्रग्जच्या जाळ्यात अडकवल्याचा आरोप आहे. अभिनेत्री क्रिसन परेरा (वय २७) हिने 'सडक २' आणि 'बाटला हाउस' सारख्या चित्रपटात काम केले आहे. (Actress Chrisann Pereira)
एका हॉलिवूड वेब सीरिजमध्ये काम देण्याचे आश्वासन देऊन 'ऑडिशन'च्या बहाण्याने या अभिनेत्रीला संयुक्त अरब अमिरातीतील शारजाह येथे बोलावण्यात आले होते, त्यानंतर तिला कथित ड्रग प्रकरणात अटक करण्यात आली. त्याच बरोबर या अभिनेत्रीच्या आईला एका रिअल इस्टेटच्या व्यवहारात मोठी रक्कम कमिशन म्हणून देतो असे म्हणून फसवणूक करण्यात आली. पोलिसांनी मंगळवारी (दि. २५) रवि बोभते आणि अँटनी पॉल यांना अटक केली. पॉलने क्रिसनची प्रमिला परेरा (वय ५६) यांना हैदराबाद येथील संपत्तीच्या व्यवहारात मोठे कमिशन देण्याचा शद्ब दिला होता. (Actress Chrisann Pereira)
पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, प्रमिला परेरा यांनी गुन्हे शाखेकडे तक्रार केल्यानंतर ही बाब उघडकीस आली. हॉलिवूड वेब सीरिजमध्ये भूमिका मिळवून देण्याच्या नावाखाली आपली मुलगी क्रिसनला फसवल्याचा त्यांनी आरोप केला आहे. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, आरोपी बोभटे याने स्वत:ला वेब सीरिजचा 'फायनान्सर' असल्याचे सांगितले व त्याचे युएई आणि भारतात प्रोजक्ट सुरु असल्याचे सांगितले. (Actress Chrisann Pereira)
तक्रारीनुसार, बोभटे याने क्रिसनला भूमिका साकारण्याची ऑफर दिली. क्रिसनने हिंदी वेब सिरीज, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केले आहे. प्रमिलाने तिच्या मुलीशी या प्रस्तावावर चर्चा केली आणि आरोपींसोबत झालेल्या भेटीनंतर क्रिसन 'ऑडिशन'साठी परदेशात जाणार असल्याचे ठरले, असे अधिकाऱ्याने सांगितले. त्यांनी सांगितले की, अभिनेत्रीला दुबईला जायचे होते पण तिचे मुंबई ते शारजाहचे विमानाचे तिकीट १ एप्रिलला काढण्यात आले. ती ३ एप्रिलला परतणार होती. अधिकाऱ्यांनी सांगितले की, याच दरम्यान प्रमिला पॉलसोबत प्रॉपर्टी डील करण्यासाठी हैदराबादला गेल्या.
अधिकाऱ्याने माहिती दिली की, प्रमिला हैदराबादमध्ये असताना त्यांना फोन आला की शारजाहमध्ये तिच्या मुलीला अफू आणि गांजासह पकडण्यात आले आहे. संयुक्त अरब अमिराती (UAE) प्रशासनाने ही बाब भारतीय दूतावासाला कळवली, त्यानंतर याबाबत मुंबई पोलिसांना कळविण्यात आले.
अधिकाऱ्याने सांगितले की, पॉलने प्रमिलाला सांगितले की शारजाहमध्ये त्याची मोठी ओळख आहे आणि क्रिसनला मदत करण्यासाठी त्याने प्रमिला यांच्याकडे ८० लाख रुपयांची मागणी केली. यानंतर प्रमिला यांना आपली व आपल्या मुलीची फसवणूक झाल्याचे लक्षात आले आणि त्यांनी गुन्हे शाखेकडे तक्रार केली.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, तपासादरम्यान पॉल आणि बोभाटे यांनी मिळून आई-मुलीची फसवणूक करण्याचा कट रचल्याचे निष्पन्न झाले आहे. एफआयआर नोंदवल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
अधिक वाचा :