‘ऑनलाईन शिक्षण’ लघुपटाचे अनावरण | पुढारी

'ऑनलाईन शिक्षण' लघुपटाचे अनावरण

पुढारी ऑनलाईन डेस्क : दोन वर्षांपूर्वी आलेल्या कोविड १९ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगाला विविध संकटांचा सामना करावा लागला. कोरोना चा प्रसार रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउन चा मोठा आर्थिक फटका बहुतांश नागरिकांना सहन करावा लागला. याच काळात शाळा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी ‘ऑनलाइन शिक्षण’ सुरू झाले. लॉकडाउन काळातील सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक क्षेत्रासह शैक्षणिक क्षेत्रात ‘ऑनलाइन शिक्षण’ आल्याने ग्रामीण जीवनावर नेमके काय परिमाण झाले यांचा वेध घेणाऱ्या लेखक, दिग्दर्शक शंभुराज कटके यांच्या ‘ऑनलाइन शिक्षण’ लघुपटाचे अनावरण करण्यात आले.

याप्रसंगी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, चित्रपट वितरक समीर दीक्षित, युवा उद्योजक विशाल सादळे, कात्रज गांव ट्रस्ट चे अध्यक्ष अजय साबळे, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे सहाय्यक प्राध्यापक बबन पाटोळे, मारुती कटके, संदीप कटके आणि लघुपटतील कलाकार, तंत्रज्ञ उपस्थित होते.

ग्रामीण जीवनाचे वास्तववादी दर्शन घडविणारा ‘ऑनलाईन शिक्षण’ हा लघुपट पुरंदर तालुक्यातील भिवरी या खेडेगावातील शंभुराज कटके या युवकाने निर्माण केला आहे.

या विषयी बोलतान शंभुराज कटके म्हणाले, शिक्षण घेत असताना मी घरच्या शेतीमध्ये काम करत होतो, शेती विषयी आवड निर्माण होत होती मात्र वडील म्हणाले शेतामध्ये दोन भावांचा उदरनिर्वाह होणार नाही . वडिलांशी एकदा भांडण झाले आणि रागाच्या भरात मी घर सोडले, पुण्यात आलो तिथे मार्केट यार्ड परिसरात मिळेल ते काम केले. गुन्हेगारीवृत्ती च्या लोकांच्याही संपर्कात आलो होतो. मात्र कालांतराने आपण निवडलेला मार्ग चुकीचा असल्याची जाणीव एका सिनेमाच्या माध्यमातून झाली. यामुळे सिनेमा क्षेत्रात काम करण्याचा निर्धार केला आणि चुकीच्या मार्गावरून कला क्षेत्राकडे वळलो. ‘ऑनलाईन शिक्षण’ हा संवेदनशील विषयांवरील लघुपट आहे.

‘ऑनलाईन शिक्षण’ या लघुपटासाठी सागर मोरे मुख्य सहाय्यक दिग्दर्शक आहेत तर प्रज्ञा पाटील-संकलक, ओमकार लोंढे-छायांकन, अपर्णा पवार – वेशभूषा, विकास सांगोलकर – निर्मिती प्रमुख, डॉ. एस. डी. पाटील – पोस्ट निर्मिती प्रमुख यांनी या जाबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.

Back to top button