चित्रपट निर्माता इम्तियाज खत्री याच्या घरावर एनसीबीचा छापा | पुढारी

चित्रपट निर्माता इम्तियाज खत्री याच्या घरावर एनसीबीचा छापा

पुढारी ऑनलाईन :

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केल्यानंतर एनसीबीने अनेक ठिकाणी छापेमारी केली. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात अडकला आहे. आता हे प्रकरण आणखी चिघळल्याचं दिसत आहे. आर्यनसोबत आणखी ७ जणांना क्रूझवरील रेव्ह पार्टीत अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता चित्रपट निर्माता इम्तियाज खत्री याच्या घरावर छापा टाकण्यात आला आहे. इम्तियाज खत्री याला एनसीबीने ताब्यात घेतलंय.

कोण आहे निर्माता इम्तियाज खत्री?

इम्तियाज खत्री हा एका बिल्डरचा मुलगा आहे. इंक इंफ्रास्ट्रक्चर नावाची त्याची कंपनी आहे. तसेच त्याची व्हीव्हीआयपी युनिव्हर्सल एंटरनेटमेंट नावाचीदेखील कंपनी आहे. यामध्ये अनेक बॉलिवूड कलाकारांना संधी दिली जाते, अशी माहिती समोर आलीय. तो बॉलिवूड चित्रपटांमध्ये पैशांची गुंतवणूकदेखील करतो, असेही समजते. इम्तिायाजचे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींशी संबंध आहे.

एनसीबीने मुंबईतील बांद्रा येथे छापा टाकला. यावेळी इम्तियाजच्या ऑफिस आणि घरावर छापा मारला. दरम्यान, एनसीबीने त्याला ताब्यात घेतलंय. त्याच्याकडे काही प्रमाणात ड्रग्स आढळून आल्याची माहिती आहे. एनसीबी रात्रीपासून ही कारवाई करत होती.

ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत १८ जणांना अटक करण्यात आलीय. क्रुझवरील छाप्यावेळी एनसीबीने १३ ग्रॅम कोकेन, २१ ग्रॅम चरस आणि २२ MDMA च्या गोळ्या, ५ ग्रॅम MD आणि १.३३ लाख रुपये जप्त केले होते.

एनसीबीचा क्रुझवर छापा

एनसीबीच्या पथकाने २ ऑक्टोबरच्या रात्री कॉर्डेलिया क्रूझवर छापेमारी केली होती. त्यावेळी आर्यन खान याच्यासह त्याचा मित्र अरबाज मर्चंट, मुनमुन धमिचा, नुपूर सारिका, इश्मित सिंग, यांना ताब्यात घेतले होते. तसेच मोहक जैस्वाल, विक्रांत चोकर, गोमित चोप्रा अशा आठ जणांना काही प्रमाणातील ड्रग्ज आणि रोख रकमेसह ताब्यात घेत चौकशी सुरू केली. एनसीबीने याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. ३ ऑक्टोबरच्या दुपारी आर्यन याच्यासह अरबाज आणि मुनमुन हिला अटक केलीय.

जामीन नाकारला

दरम्यान, आर्यन खान याच्यासह आठ आरोपींना राष्ट्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) गुरुवारी दि. ८ रोजी दुपारी न्यायालयासमोर हजर केले. दोन्ही पक्षांमध्ये ३ तासांहून अधिक काळ चाललेल्या युक्तिवादानंतर न्यायालयाने आठही आरोपींना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीचे आदेश दिलेत. त्यामुळे या आरोपींच्या जामिनाचा मार्ग मोकळा झालाय. आता जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे.

Back to top button