बॉलिवूड किंग शाहरुख खानची ब्रँड व्हॅल्यू धोक्यात! | पुढारी

बॉलिवूड किंग शाहरुख खानची ब्रँड व्हॅल्यू धोक्यात!

मुंबई/नवी दिल्ली; वृत्तसंस्था : ड्रग्ज केसमध्ये मुलगा आर्यन खान याला अटक झाल्यानंतर बॉलिवूड किंग शाहरुख खान याची ब्रँड व्हॅल्यू धोक्यात आली आहे. शाहरुख जाहिरात करत असलेल्या ब्रँडस्नाही लोक ट्रोल करत आहेत. एका एज्युकेशनल स्टार्ट-अपची जाहिरात करणार्‍या शाहरुख याला उद्देशून, ‘तुम्ही स्वत:च्या मुलाला काही शिकवू शकला नाही, तुमच्या चाहत्यांच्या मुलांना कसे शिकविणार’, असा सवाल ट्रोलर्सनी केला आहे.

‘डफ अँड फॅल्प्स’ या बहुराष्ट्रीय वित्तीय सल्लागार संस्थेने फेब्रुवारी 2021 मध्ये दिलेल्या माहितीनुसार किंग शाहरुख खान याची ब्रँड व्हॅल्यू या क्षणाला 378 कोटी रुपये आहे. तुलनेत ज्येष्ठ असूनही विराट कोहली, अक्षयकुमार, रणवीर सिंग यांच्याशी शाहरुख आजही स्पर्धा करतो.

जगातील तिसरा श्रीमंत नट; दिवसाची कमाई 4 कोटी

जगभरातील कमाईच्या हिशेबाने टॉप टेन नटांच्या यादीत भारतातून अमिताभ बच्चन व शाहरुख खान हे दोघे आहेत. शाहरुख याची एकूण संपत्ती 5 हजार 116 कोटी रुपये आहे. जॅरी सॅनफिल्ड आणि टॉयलर पॅरीनंतर शाहरुख हे जगातील तिसरे सर्वाधिक श्रीमंत अभिनेते आहेत. अमिताभ या यादीत आठव्या स्थानी आहेत.

जाहिरातींसाठी एका दिवसाच्या शूटिंगचे शाहरुख खान 4 कोटी रुपये आकारतो, असे सांगण्यात येते. बायजू या एका शैक्षणिक अ‍ॅपचा मॉडेलही शाहरुख आहे. लोकांनी थेट कंपनीच्या ट्विटर हँडलला टॅग करून शाहरुखबाबत कंपनीने पुनर्विचार करावा, असे आवाहन या स्टार्टअपला उद्देशून केले आहे.

‘लोकांच्या मुलांना पुड्या खायला शिकवाल तर तुमची मुले ड्रग्ज घेतील’ काही दिवसांपूर्वी शाहरुख आणि अजय देवगण यांनी मिळून ‘विमल’ पुडीची जाहिरात केली होती. इतरांच्या मुलांना गुटखा खायला शिकवाल तर तुमची मुले ड्रग्ज घेतील म्हणून सावधान… व्यसनांना प्रोत्साहन देऊ नका, असा सल्लाही ट्रोलर्सनी दिला आहे.

Back to top button