मनोरंजन : महानायकाचा जीवनपट… | पुढारी

मनोरंजन : महानायकाचा जीवनपट...

बांगलादेश सध्या आपल्या देशाच्या निर्मितीचा सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे. बांगलादेशचे राष्ट्रपिता शेख मुजीबूर रेहमान यांची जन्मशताब्दी वर्ष 2020 मध्ये साजरे करण्यात आले. ‘वंगबंधू’ शेख मुजीबूर रेहमान यांच्याशी आणि बांगलादेशाशी भारताचे एक वेगळे नाते आहे. शेख मुजीबूर रेहमान यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून भारताच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीने शेख मुजीबूर रेहमान यांचा जीवनपट म्हणजे बायोपिकची निर्मिती करण्यात येत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन श्याम बेनेगल करत असल्यामुळे त्याविषयी अपेक्षा उंचावल्या आहेत.

इतिहासाच्या विशिष्ट कालखंडावर प्रभाव टाकणार्‍या कोणत्याही व्यक्तिमत्त्वाचा वेध चित्रपट माध्यमातून घेणे तसे आव्हानात्मक काम असते. अशा व्यक्तींचा जीवनपट निर्माण करणे तर त्याहून कठीण काम. जीवनपट निर्माण करताना दिग्दर्शक व पटकथा लेखकांनी साहित्यातील चरित्रात्मक लेखनविषयक दंडकांचे पालन करणे अपेक्षित असते. एका तटस्थ भूमिकेतून त्यांनी चरित्रनायक वा नायिका यांच्या जीवनाचा घेतलेला वेध चित्रपटाला वेगळीच कलात्मक उंची प्राप्त करून देतो. अतुल तिवारी आणि शमा जैदी यांनी चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. शंतनू मोईत्रा यांचे संगीत आणि नितीश रॉय यांचे कलादिग्दर्शन ‘वंगबंधू’मध्ये अनुभवण्यास मिळणार आहे. ‘वंगबंधू’त अभिनय करणारे सर्व कलाकार बांगलादेशी आहेत, हे चित्रपटाचे एक आणखी वेगळेपण सांगता येते. बांगलादेशचा चित्रपट व दूरचित्रवाणी अभिनेता आरफिन शुवू ‘वंगबंधू’ शेख मुजीबूर रेहमान यांची भूमिका साकारत असून, नुसरत इमरोस तिशा ही शेख फाजिलतुन्नेसाची भूमिका साकारत आहेत.

नुसरत फरिया सध्या बांगलादेशच्या पंतप्रधान असलेल्या आणि ‘वंगबंधूं’च्या कन्या शेख हसीना यांची भूमिका साकारणार आहेत. तौकिर अहमद हे सोहरावर्दी यांच्या भूमिकेत आहेत. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी व इतर समकालीन व्यक्तिरेखा कोण साकारणार आहेत, याविषयी अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही. जीवनपटाची निर्मिती व दिग्दर्शनसह सर्व महत्त्वाचे पैलू भारतीय कलावंत सांभाळणार आहेत, तर अभिनयाची बाजू बांगलादेशी कलांवत! हे या जीवनपटाचे एक वेगळेपण अधोरेखित करावे लागते. भारत व बांगलादेश यांच्यातील मैत्र जीवाचे हा भाव वृद्धिंगत होण्यासाठी हा जीवनपट एक सेतू म्हणून काम करू शकतो. ‘वंगबंधू’ शेख मुजीबूर रेहमान यांचे जीवन चित्रपट माध्यमाच्या अवकाशात बसवणे तसे आव्हानात्मकच म्हणावे लागेल. 17 मार्च 1920 रोजी ढाक्याजवळील फरिदपूर जिल्ह्यातील ‘टांगीपाडा’ गावात, एका सामान्य न्यायालयीन कर्मचार्‍याच्या पोटी जन्मलेला आणि कोलकात्याच्या इस्लामिया महाविद्यालयातून बी.ए. पदवी घेतलेला एक मुलगा नव्याने जन्माला येऊ घातलेल्या राष्ट्राचा सर्वमान्य नेता हा त्यांचा प्रवास दक्षिण आशियातील एका पर्वाचा प्रवास आहे.

संबंधित बातम्या

स्थानिक ते आंतरराष्ट्रीय परिस्थिती, प्रवृत्ती, धारणा, राजकीय महत्त्वाकांक्षा, गरज इत्यादी अनेक पैलंमधून ‘वंगबंधूं’चे चरित्र निरपेक्षपणे साकार करण्यासाठी दिग्दर्शक म्हणून श्याम बेनेगल यांची कसोटी लागणारच, यात शंका नाही. शेख मुजीबूर रेहमान यांच्या जीवनातील प्रत्येक प्रसंगामागे विविध स्तरातील घटना, व्यक्ती आणि परिस्थिती यांच्यासोबतच एक व्यक्ती म्हणून व एक नेता म्हणून त्यांची बलस्थाने आणि मर्यादा ते कशा पद्धतीने पडद्यावर उतरवतात, हे पाहणे खरोखरच औत्सुक्यपूर्ण राहणार आहे. कोणताही महान नेता हा त्याकाळाचे अपत्य असतो. तत्कालीन सामाजिक व राजकीय परिस्थिती नेमकेपणाने मांडत, दिग्दर्शकाला प्रेक्षकांना त्याकाळात घेऊन जाता आले तरच एखादा नेता ‘महान’ का ठरला? हे समजू शकते.

ब्रिटिशांची धोरणं, दक्षिण आशियात त्यांनी द्विराष्ट्र सिद्धांत रुजवण्यासाठी केलेले नियोजनबद्ध प्रयत्न, हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरण, फाळणी, पूर्व-पश्चिम पाकिस्तान अशी विचित्र भौगोलिक रचना, पश्चिम पाकिस्तानचा पूर्व पाकिस्तानकडे पाहण्याचा द़ृष्टिकोन, पूर्व पाकिस्तानची धर्मापेक्षा आपल्या बंगाली संस्कृती व भाषेविषयी असलेली अस्मिता, त्यामुळे त्याचा भारताकडे असलेला स्वाभाविक कल, ब्रिटन-अमेरिका यांचे राजकीय डावपेच, भारताचे धोरण, पूर्व पाकिस्तानकडे भारताचा असलेला नैसर्गिक कल; अशा कितीतरी तथ्यांच्या पायावर उभा राहून शेख मुजीबूर रेहमान हा सामान्य माणूस बांगलादेशाचा ‘जातीर जनक’ अथवा ‘राष्ट्रपिता’ होण्यापर्यंतचा प्रवास श्याम बेनेगल यांना दाखवायचा आहे. बांगलादेशाची निर्मिती झाल्यानंतर देशाची सत्ता सांभाळलेल्या शेख मुजीबूर रेहमान या महानायकाच्या संघर्षगाथेचा क्लायमॅक्स सुखांत होणे अपेक्षित होते. तसे होऊ शकले नाही.

या कथेत पाकिस्तानची सुडबुद्धी आणि बांगलादेशचा सेनाध्यक्ष जनरल शफीउल्लाह याची सत्तालालसा चरित्रनायकाचा घात करते. 15 ऑगस्ट 1975 रोजी आपल्या सैन्याची एक तुकडी पंतप्रधान शेख मुजीबूर रेहमान यांच्या ‘32 घनमंडी’ या निवासस्थानी घुसवून त्यांची व त्यांच्या कुटुंबीयांची निर्घृण हत्या केली जाते. त्यांची पत्नी, दोन मुलं, सुना. एवढेच नव्हे, तर दहा वर्षांच्या सर्वांत लहान मुलाचीदेखील हत्या होते. या हत्याकांडाला लष्कराचा उठाव कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. 16 ऑगस्टला शेख मुजीबूर रेहमान यांचे शव सोडून इतरांच्या शवाला एकाच खड्ड्यात दफन केले जाते. त्यांचे शव त्यांच्या गावी म्हणजे ‘टांगीपाडा’ येथे आणले जाते. कोणी अंत्ययात्रेत सहभागी होऊ नये म्हणून गावाला सैन्याचा घेराव घातला गेला.

दफनविधी करणारा काजी सांगतो, स्नान घातल्याशिवाय दफन शक्य नाही. गावात अंघोळीचा साबण उपलब्ध होत नाही म्हणून कपडे धुण्याच्या साबणाने अंघोळ घातली जाते. अखेर पित्याच्या कबरीशेजारी या महानायकाला एका बेवारस माणसाप्रमाणे दफन केले जाते. भविष्यात त्यांच्या परदेशात शिक्षणासाठी असल्यामुळे वाचलेल्या दोन कन्यांपैकी शेख हसीना वाजेद या देशाच्या पंतप्रधान बनतात. आज त्यांच्या नेतृत्वात बांगलादेश प्रगती करत आहे. एखाद्या उत्तम चित्रपटापटासाठी आवश्यक सगळा ऐवज या महानायकाच्या जीवनगाथेत आहे. तो श्याम बेनेगल त्यांच्या जीवनपटात अभिजातपणे कसा उतरवतात, याविषयी उत्सुकता आहे.

इतिहासाच्या विशिष्ट कालखंडावर प्रभाव टाकणार्‍या कोणत्याही व्यक्तिमत्त्वाचा वेध चित्रपट माध्यमातून घेणे तसे आव्हानात्मक काम असते. ‘वंगबंधू’ शेख मुजीबूर रेहमान यांचे जीवनही त्याला अपवाद नाही.

राहुल हांडे

Back to top button