…आणि कंगनाला संताप अनावर | पुढारी

...आणि कंगनाला संताप अनावर

अभिनेत्री कंगना राणावत सध्या ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाच्या निर्मितीत व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वी तिने या चित्रपटाचे शूटिंग संसदेत करण्याची परवानगी मागितली असल्याचे समोर आले होते. कारण, तशी बातमी एका वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केली. एवढेच नव्हे, तर तशी परवानागी कंगनाला मिळाल्याचेही त्या वृत्तात म्हटले होते. त्यामुळे कंगनाचा पार चढला. आपण अशी कोणतीही परवानगी मागितलेली नाही, असा स्पष्ट खुलासा तिने केला आहे.

जाता जाता मीडियाला युक्तीच्या चार गोष्टी सांगायलाही ती विसरली नाही. सांगण्याचा मुद्दा असा की, ‘इमर्जन्सी’चे शूटिंग या यंदाच्या जूनमध्ये सुरू झाले. या चित्रपटात ती 1975 मध्ये देशात आणीबाणी लागू करणार्‍या दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. त्याचप्रमाणे कंगनाने या चित्रपटाच्या लेखनाची आणि दिग्दर्शनाची धुराही सांभाळली आहे. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होईल. राजकीय घडामोडी हाच या चित्रपटाचा गाभा असल्यामुळे रसिकांचे त्याकडे लक्ष लागले आहे.

Back to top button